मुंबई,दि.18: भाजपाच्या तीन नेत्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. मनोज जरांगे मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहेत. तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असे जाहीर केले होते. अशातच भाजपा नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यापूर्वी भाजपच्या तीन नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे हे तीनही नेते विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असून त्यांनी पक्षाकडे तशी इच्छा बोलूनही दाखवली आहे. दैनिक सामनाने टी.व्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपण उमेदवार उभे करणार असे जरांगे पाटील यांनी जाहीर केले होते. तसेच इच्छुकांनी त्यासाठी आपले अर्ज द्यावेत असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते. टी.व्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने याबबात वृत्त दिले आहे. जरांगे पाटील यांच्याकडे आतापर्यंत 700 इच्छूक उमेदवारांचे अर्ज आल्याचे सांगण्यात येत आहे.
इतकंच नाही तर भाजपच्या तीन नेत्यांनी जरांगे पाटील यांची भेटही घेतली आहे. त्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरे, नांदेडच्या मीनल खतगावकर आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांचा समावेश आहे.
जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर संगीता ठोंबरे म्हणाल्या की आजही मी भाजपची पदाधिकारी आहे, पण जरांगे पाटील यांची भुमिका आम्हाला मान्य आहे, जरांगे पाटील यांच्यासोबत आम्ही राहू आणि त्यांनी निरोप दिला की महत्त्वाचा निर्णय घेऊ असे सूचक विधान त्यांनी केले आहे.
बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी आपण बीड विधानसभेतून आपण इच्छूक असल्याचे म्हटले आहे. तसेच कोअर कमिटीसाठी पंकजा मुंडे यांनी आपल्या नावासाठी आग्रह धरला आहे असेही म्हस्के म्हणाले. जरांगे पाटलांची भेट ही राजकीय नव्हती असेही म्हस्के म्हणाले.
आतापर्यंत आपल्याकडे 700 जणांनी अर्ज दिला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे सर्व जाती धर्माच्या लोकांनी अर्ज दिला आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.