मुंबई,दि.18: डिसेंबर महिन्याच्या मध्यापासून राज्यात थंडीची चाहुल लागली आहे. मुंबई, सोलापूर, पुण्यासह राज्याच्या इतर भागात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. मात्र, दोन दिवसांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईतदेखील पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
पुणेकर गेल्या दोन दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, २० डिसेंबरनंतर किमान तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान रविवारी (दि. १७) शहरातील किमान तापमान १३.२ अंश सेल्सिअस इतके होते. तर पाषाण आणि एनडीए परिसरात थंडीचा जोर अधिक होता.
राज्यातील काही भागात विशेषतः गोवा परिसरात ढगाळ वातावरण आणि उत्तरेकडून येणारी थंड हवा मध्य प्रदेश व मध्य भारतातून राज्यात येत असल्याने पुढील २४ तासात गोव्यात हलका व अति हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबई आणि उपनगरातील किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. तर आणखी दोन दिवस रोज रात्री तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. त्यानंतर पुढील दोन दिवसांत ते पुन्हा 19 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येईल. राज्यातही तापमानात मोठे बदल होत आहेत. दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारा येत असल्याने राज्यातील हवामानात मोठा बदल होईल. राज्यातील काही भागांमध्ये थंडी असणार आहे. तर मुंबईसह काही भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र पुढच्या दोन दिवसांमध्ये कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये किमान तापमानात वाढ होऊ शकते असा अंदाज आहे.