हैदराबाद,दि.२७: संतप्त नागरिकाने महापालिका कार्यालयातच साप सोडला, याचा Video व्हायरल झाला आहे. सरकारी काम आणि ६ महिने थांब, अशी मराठीत म्हण आहे. अनेकदा या म्हणीचा प्रत्यय नागरिकांना येत असतो. नागरिकांची कामे शासनाच्या लाल फितीत अडकून बसतात. तर, काहीवेळा फाईलवर आर्थिक वजन न ठेवल्यास ती फाईलच मंजूर होत नाही. त्यामुळे, नागरिकांकडून संबंधित अधिकारी, कर्मचारी किंवा कार्यालयाबद्दल तीव्र शब्दात संताप व्यक्त केला जातो. त्याविरुद्ध अनेकदा आंदोलनही केले जाते. मात्र, शासकीय कार्यालयातील ही अनास्था आजही पाहायला मिळते. हैदराबाद महानगरपालिकेतील अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणाचा संताप एक नागरिकाने वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केला.
सरकारी अधिकाऱ्याच्या उदासिनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकाने चक्क संबंधित अधिकाऱ्याच्या कार्यालयातच साप सोडला. हैदराबादमधील एका नगरपालिकेच्या कार्यालयात या पीडित व्यक्तीने साप सोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. भाजपाचे युवक नेते विक्रम गौड यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाला असून सरकारी प्रशासनाविरुद्ध नेटीझन्सही संताप व्यक्त करत आहेत.
हैदराबादच्या अलवाल येथे पाऊस सुरू असताना एका नागरिकाच्या घरी साप निघाला. त्यामुळे, त्या नागरिकाने ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका कार्यालयात संपर्क केला. येथील अधिकाऱ्यांना फोन करुन साप पकडण्याबाबत विनंती केली. मात्र, अनेकदा विनवणी करुनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त नागरिकाने थेट महापालिका कार्यालयात येऊन तो साप सोडला.
दरम्यान, भाजपा नेते विक्रम गौड यांनी लिहिलं आहे की, एखादा माणूस एवढा संतप्त होऊन हे कृत्य करतो. म्हणजे, विचार करा त्याला किती त्रास सहन करावा लागला असेल. व्हिडिओत एका टेबलावर साप बसल्याचे दिसून येते. तर, जवळच एका व्यक्तीचा आवाज येत असून तो महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल बोलताना ऐकू येते.