पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान, भाजपाच्या नियमाचं काय होणार?

0

नवी दिल्ली,दि.२७: पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी दोन टर्म पंतप्रधान झाले आहेत. २०१९च्या निवडणुकांआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना तिकीट न दिलं जाण्यावरून राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. यासंदर्भात भाजपावर व विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्येष्ठांना डावलल्याची टीका करण्यात आली होती. मात्र, हा पक्षाचा निर्णय असल्याचं भाजपाकडून तेव्हा सांगण्यात आलं होतं. त्याामुळे भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा पक्षसंकेत रूढ झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांनीही बंडखोरीनंतर शरद पवारांना लक्ष्य करताना भाजपाच्या याच नियमाचा दाखला दिला. मात्र, आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच भाजपाच्या या पक्षसंकेतांना डावलून पुढे जाण्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच दिल्याचं बोललं जात आहे.

यांना तिकीट नाकारण्यात आले

२०१९च्या लोकसभा निवडणुकांआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं. त्यासंदर्भात टीका झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना “फक्त माध्यमांकडून यावर रान उठवलं जात आहे. ७५ वर्षांच्या वरच्या कुणालाही तिकीट देण्यात आलेलं नाही. हा पक्षाचा निर्णय आहे”, असं सांगितलं होतं. २०१९मध्ये अमित शाह गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडून आले. त्यांच्याआधी तो मतदारसंघ लालकृष्ण अडवाणी यांचा होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे विधान

एकीकडे भाजपाच्या ‘पंचाहत्तरीनंतर तिकीट नाही’ या पक्षसंकेताची चर्चा असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र वेगळे सूतोवाच केले आहेत. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीच्या प्रगती मैदानावरील कन्व्हेन्शन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी मोदींनी बोलताना आपल्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टर्मचा उल्लेख केला.

भाजपाच्या नियमाचं काय होणार?

२०१४ व २०१९ असे दोन वेळा सलग पंतप्रदान नरेंद्र मोदीच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदीच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. या पार्श्वभूमीवर खुद्द मोदींनीही दिल्लीत बुधवारी तसेच सूतोवाच केल्यानंतर भाजपाच्या ७५ वर्षांच्या नियमाचं काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

“मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल. ही मोदीची गॅरंटी आहे. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली. पण माझ्या तिसऱ्या कार्यकाळात ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना पाहू शकेल. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा विकासरथ अधिक वेगाने धावेल”, असं मोदी या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ७२ वर्षांचे आहेत. पुढील वर्षी निवडणुकांच्या काळात ते ७३ वर्षांचे असतील. त्यामुळे भाजपानं या निवडणुका जिंकल्या आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले, तर ते ७८ वर्षांचे होईपर्यंत पंतप्रधानपदी राहतील. त्यामुळे आता पंचाहत्तरीनंतरही पंतप्रधानपदीच राहण्याचे मोदींचे सूचोवाच नव्या राजकीय चर्चेसाठी कारणीभूत ठरले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here