तानाजी सावंत यांचा मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दावा

0

धाराशिव,दि.२८: तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात मोठा दावा केला आहे. आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. असे असतानाच शनिवारी राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रा. डॅा. तानाजी सावंत यांनी तुळजापुरात मोठं वक्तव्य केलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न येत्या दोन दिवसांत सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तुळजापूर येथील महाआरोग्य शिबिरास भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मंत्री सावंत म्हणाले, मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तसेच केंद्रातील नेतेमंडळी प्रयत्न करीत आहेत. निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून युध्द पातळीवर पुरावे गाेळा करण्यात येताहेत. ही समिती प्रत्येक जिल्ह्यात जावून प्रशासन तसेच नागरिकांकडून पुरावे स्वीकारत आहे.

एकूणच हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर काम सुरू आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल, अशी आशा असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here