शरद पवार यांनी अजित पवारांच्या त्या निर्णयाचं केलं स्वागत

0

मुंबई,दि.२८: शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मराठा आरक्षणावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. दिलेल्या वेळेत सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लावल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षणाची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी राजकीय नेत्यांना बंदी घातली आहे. राज्यभरात याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर जाणार होते. बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ अजित पवारांच्या हस्ते होणार होता. पण मराठा क्रांती मोर्चाचा आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केला आहे. अजित पवारांनी दौरा रद्द केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवारांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

“मराठा समाजाची आरक्षणाबाबत काहीतरी भावना आहे, अशावेळी तिथे संघर्ष टाळणं, हे शहाणपणाचं लक्षण आहे. माझ्या मते अजित पवारांनी जो निर्णय घेतला, तो योग्य निर्णय होता,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवारांनी बारामती दौरा रद्द केल्यानंतर ते पुण्यातील शिवाजीनगर भागातील जिजाऊ निवासस्थानी दाखल झाले. या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here