सोलापूर,दि.३: सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) खासगी ट्रॅव्हल्स (Travels) चालकांना इशारा दिला आहे. उन्हाळा व शाळांना सुट्या लागल्या की, सणासुदीला गावाकडे जाण्याचे वेध लागतात. लग्नसराई, पर्यटनस्थळी जाण्यासाठी अनेकजण रेल्वे व एसटीचे आरक्षण फुल्ल होत असल्यामुळे ट्रॅव्हल्सच्या तिकिटांचे बुकिंग करत आहेत. परंतु अशावेळी ट्रॅव्हल्स चालकांनी ठरवून दिलेल्या तिकिटांपेक्षा अधिकचे पैसे प्रवाशांकडून घेतले तर त्या ट्रॅव्हल्स मालकावर नियमांप्रमाणे कारवाई केली जाईल, असा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने देण्यात आला आहे.
सध्या परीक्षांचे दिवस आहेत. काही परीक्षा सुरू असून काही संपल्या आहेत. त्यामुळे उन्हाळी सुट्टी लागताच विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीय गावाकडे जात आहेत. परिणामी प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रेल्वेचे आरक्षणही ‘फुल्ल’ झाले आहे. त्यामुळे कुटुंबासह प्रवास करणारे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्स बसकडे वळतात. सोलापूर शहरातून पुणे, मुंबई, शिर्डी, कोल्हापूर, लातूर, नांदेड, बीड, औरंगाबाद, अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ, जळगाव, धुळे, नंदूरबार, सुरत यासह परराज्यांतही रोज शेकडो खासगी प्रवासी साध्या, वातानुकूलित, स्लीपर कोच यासह अनेक सुविधा असणार्या बसमधून प्रवास करतात.
परंतु सण, उत्सव इतर सुट्या आल्या की ट्रॅव्हल्स तिकिटात वाढ करुन प्रवाशांची आर्थिक लूट होते. अचानक भाडेवाढ कशासाठी, अशी विचारणा केली, तर याचे काही उत्तर नसते. मग ही मनमानी भाडेवाढ का, असा संतप्त सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. या भाडेवाढीवर नियंत्रण कोणाचे हा खरा प्रश्न आहे. अशा भाडेवाढीमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जात आहे. याकडे शासनाच्या संबंधित विभागाने लक्ष देण्याची वेळ आली आहे.
ट्रॅव्हल्सच्या चालकांनी आपल्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अतिवेगामुळेच अपघाताची शक्यता वाढते. अशावेळी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या चालकांना वाहने सावकाश चालविण्याची सूचना करणे गरजेचे आहे. ट्रॅव्हल्सचे चालक किती वेगाने वाहने चालवितात, चालक वेगाला आवर घालत आहेत की नाही, सर्व कागदपत्रे जवळ बाळगतात की नाही, या सर्व गोष्टी पडताळणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने पथकाची नियुक्ती केली आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन केले नाही तर दंड स्वरुपात कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद येथून येणार्या प्रवाशांनी जे नियम ठरले आहेत त्याप्रमाणेच तिकिटाचे पैसे द्यावेत. अधिकचे पैसे ट्रॅव्हल्स मालक घेत असतील तर त्यांची तक्रार प्रादेशिक परिवहन विभागाकडे करावी. तक्रार आल्यानंतर नियमानुसार दंड ठोठावला जाणार आहे.
विजय पाटील
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी