Home विज्ञान आणि तंत्रज्ञान सोलापुरात एअरटेल नेटवर्कचा खोळंबा; फोन लावताच एक रिंग वाजून कॉल होतोय ‘बिझी’

सोलापुरात एअरटेल नेटवर्कचा खोळंबा; फोन लावताच एक रिंग वाजून कॉल होतोय ‘बिझी’

0

सोलापूर,दि.२५: सोलापूर वार्ता विशेष | सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील एअरटेल (Airtel) ग्राहकांना सध्या एका मोठ्या तांत्रिक समस्येचा सामना करावा लागत आहे. मोबाईल धारकांनी कोणालाही फोन लावल्यास अवघ्या एका सेकंदात किंवा एक रिंग वाजून फोन आपोआप कट होत आहे, तसेच समोरील व्यक्तीचा फोन ‘व्यस्त’ (Busy) असल्याचा संदेश ऐकू येत आहे. या विचित्र तांत्रिक अडचणीमुळे ग्राहक पुरते हैराण झाले असून, संपर्क साधणे कठीण झाले आहे.

सर्रास ग्राहकांना फटका

मिळालेल्या माहितीनुसार, हा त्रास प्रामुख्याने एअरटेलचे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना जाणवत आहे. जर कॉल करणारी व्यक्ती एअरटेल नेटवर्कवर असेल, तर समोरील व्यक्ती उपलब्ध असूनही कॉल जोडला जात नाही. केवळ एक रिंग वाजते आणि कॉल डिस्कनेक्ट होतो.

ग्राहक त्रस्त, संवादात अडथळा

अनेक महत्त्वाच्या कामांसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीतही फोन लागत नसल्याने सोलापूरकरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सध्या फोनवर बोलणे लॉटरी लागण्यासारखे झाले आहे. एका रिंगनंतर फोन कट होत असल्याने समोरील व्यक्ती जाणूनबुजून फोन कट करत असल्याचा गैरसमज निर्माण होत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया एका ग्राहकाने दिली.

तांत्रिक बिघाड की काय?

एअरटेलच्या या समस्येमुळे व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. कंपनीच्या सर्व्हरमधील तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) हा प्रकार घडत असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, एअरटेल कंपनीकडून या समस्येवर अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, कंपनीने ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी सोलापुरातील ग्राहकांकडून केली जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.