Home सोलापूर वार्ता ‘हर्र बोला हर्र…’ च्या जयघोषात ६८ लिंग पदयात्रा संपन्न; महिलांचे संरक्षण अन्...

‘हर्र बोला हर्र…’ च्या जयघोषात ६८ लिंग पदयात्रा संपन्न; महिलांचे संरक्षण अन् पावसासाठी घातले साकडे

0

सोलापूर,दि.३१: प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्रावणी तिसऱ्या रविवारी ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने, ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंगांची पदयात्रा काढण्यात आली. या उपक्रमाचे हे ५१ वे वर्ष होते.

सकाळी ७ वाजता ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची आरती व पूजन करून पदयात्रेला प्रारंभ झाला. ‘हर्र बोला हर्र…’ च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत भक्तांनी राज्यातील महिला व मुलींचे संरक्षण तसेच चांगल्या पावसासाठी साकडे घातले. ९ तासांत १८ किलोमीटरचे अंतर पार करत, दुपारी ३ वाजता श्री मल्लिकार्जुन मंदिर येथे आरती करून पदयात्रेचा समारोप करण्यात आला.

बसवराज सावळगी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ६८ लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष शिवानंद सावळगी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा पार पडली. यामध्ये वीरशैव व्हिजनचे संस्थापक सहसचिव संजय साखरे, उत्सव समिती अध्यक्ष विजयकुमार बिराजदार यांच्यासह अक्कलकोट व पुण्याहून आलेले भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. माहेश्वरी वाघमारे, राधिका अंगेरी यांच्यासह अनेक सिद्धेश्वर भक्तांनी यंदा पहिल्यांदाच या पदयात्रेत सहभाग नोंदवला.

पदयात्रेच्या दरम्यान मीठ गल्ली येथील ‘शिवानुभव मंगल कार्यालय’ येथे आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी यांच्या वतीने उपस्थितांसाठी फराळ व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. तर समारोपाच्या वेळी वीरशैव व्हिजनतर्फे सर्व पदयात्रेकरूंना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी महेश माळगे-स्वामी, बसवराज बेऊर, धानेश सावळगी, मल्लिनाथ सोड्डे, महेश गुड्डद, दीपक पटणे व महादेव कलशेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.