Home देश सीहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये भक्तीचा महापूर; कावड यात्रेत १७ लाख भाविक सहभागी

सीहोर येथील कुबेरेश्वर धाममध्ये भक्तीचा महापूर; कावड यात्रेत १७ लाख भाविक सहभागी

0

सदाशिव बेडगे/सीहोर: मध्यप्रदेशातील सिहोर येथील प्रसिद्ध शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. २५ ऑगस्ट २०२६ रोजी भौम प्रदोषाच्या शुभमुहूर्तावर सकाळी ९ वाजता सीवन नदीतून जल घेऊन ११ किलोमीटर अंतरावरील कुबेरेश्वर धामाकडे ही यात्रा निघाली. या ऐतिहासिक भक्ती सोहळ्यात देश-विदेशातून तब्बल १७ लाख भाविक सहभागी झाले होते.

खांद्यावर कावड घेऊन भाविक ‘बोल बम बोल बम’, ‘हर हर महादेव’ आणि ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’चा गजर करत ११ किलोमीटर चालत कुबेरेश्वर धाम येथे पोहोचले. तेथे भाविकांनी कावडीतील जल कुबेरेश्वर महादेवाला अर्पण करून आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली.

कावड यात्रेचे धार्मिक महत्त्व:

पंडित प्रदीप मिश्रा यांनी यात्रेचे महत्त्व सांगताना स्पष्ट केले की, समुद्रमंथनादरम्यान महादेवाने विषप्राशन केले तेव्हा जगतजननी पार्वती मातेने श्रावण महिन्यातील भौम प्रदोषाच्या दिवशी पहिली कावड वाहिली होती. त्यानंतर रावणाने ऐश्वर्यप्राप्तीसाठी आणि भगवान परशुरामांनीही महादेवाला कावड अर्पण केली होती; तिथूनच ही कावड परंपरा सुरू झाली. कावड अर्पण केल्याने इच्छित मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

या सोहळ्यादरम्यान स्थानिक प्रशासन, पोलीस दल, आरोग्य यंत्रणा आणि सेवाधाऱ्यांचे नियोजन अत्यंत उत्कृष्ट होते. ‘एक लोटा जल, सर्व समस्यांवर हल’ हाच विश्वास या वेळी प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

कॉपी करू नका.