पैसा कमवणे म्हणजे जीवन नव्हे, मनुष्यधर्म सार्थक करणे महत्त्वाचे: श्री काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य

0

सोलापूर,दि.16: पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातच आई-वडील, आजी-आजोबा यांच्याकडून संस्काराचे बीजारोपण होत होते. पण सध्याच्या काळात विभक्त कुटुंब पद्धत समाजात रूढ झाली आहे. आई वडील दोघेही आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत. अनेक कुटुंबांमधील आजी-आजोबा नाहीसे झालेत. यामुळे मुलांवर संस्कार होत नाहीत. पैसा कमवणे म्हणजे जीवन नव्हे. मनुष्यधर्म सार्थक करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे कुटुंबातूनच संस्कार होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन श्री काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.

श्री काशीपीठ अंतर्गत श्रीकाशीजगद्गुरु विश्वाराध्य वीरशैव विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर नागणसूर मठाचे मठाधिपती श्री श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी, मैंदर्गी मठाचे मठाधिपती श्री नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी, श्री शिवकुमार स्वामीजी, हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश पाटील, श्री दानम्मादेवी ट्रस्ट गुड्डापूरचे अध्यक्ष सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, वेदमूर्ती बसवराज शास्त्री, सुविद्या प्रकाशनचे बाबुराव मैंदर्गीकर, वीरशैव साहित्याचे अभ्यासक डॉ. अनिल सर्जे, बृहन्मठ होटगीचे सचिव शांतय्या स्वामी उपस्थित होते.

नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी बोलताना म्हणाले की श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक कार्य अलौकिक आहे. वयाच्या 76 व्या वर्षीदेखील अविश्रांतपणे त्यांचे कार्य चालूच आहे. त्यांचे ऋण आपण कदापी फेडू शकणार नाही.

यावेळी श्री काशी जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पंडित, प्रवीण व प्रबोध परीक्षेत राज्यात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या परीक्षार्थींना पारितोषिके देण्यात आली. त्याचबरोबर वीरशैव सिद्धांत परीक्षेच्या पाठ्यपुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच परीक्षा केंद्रांच्या केंद्रप्रमुख पदाच्या निवडीचे पत्र वितरित करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या प्रसादाची व्यवस्था श्री बृहन्मठ होटगी संस्थानच्या वतीने करण्यात आली.

प्रारंभी उपस्थितांचे स्वागत विद्यानंद स्वामी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परीक्षा विभागप्रमुख राजेंद्र बलसुरे यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ आकाशे यांनी तर आभारप्रदर्शन गुरुशांत रामपुरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चिदानंद मुस्तारे, सचिन विभुते, संदीप स्वामी, संतोष बिराजदार, सिद्धाराम कोरे, राजशेखर बुरकुले यांनी परिश्रम घेतले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here