मुंबई,दि.१६: Jayant Patil NCP: अजित पवारांसह सत्तेत सहभागी झालेल्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असतानाच अचानक सर्वांनी शरद पवारांची भेट घेतली. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. (Jayant Patil NCP)
शरद पवार यांच्यासोबत अर्धा तास चर्चा करुन परत हे नेते अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान, या भेटीत नेमकी चर्चा काय झाली. याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये नेमकी काय चर्चा झाली यासह संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
काय म्हणाले जयंत पाटील? | Jayant Patil NCP
जयंत पाटील म्हणाले, “सरकारच्या चहापानाबाबत विरोधीपक्षनेते यांच्याबरोबर बैठक सुरु होती. तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा फोन आला आणि शरद पवारांनी बोलावलं आहे, असं सांगितलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.”
झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली
“सर्वांनी झालेल्या घटनेबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. यातून मार्ग काढण्याची विनंती केली आहे. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
सहानभुती निर्माण करण्यासाठी ही भेट होती का? या प्रश्नावर जयंत पाटील यांनी सांगितलं की, “अचानकपणे ते येऊन भेटले आहेत. कोणाचा काय उद्देश होता, यावर आज सांगणं अवघड आहे. पण, सर्वांनी दिलगीरी आणि खंत व्यक्त केली आहे. तसेच, सर्वांनी एकत्र यावं, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. आमची फारशी चर्चांही झाली नाही.”