पुणे,दि.1: Shivshahi bus caught fire: पुण्यात आज बर्निंग बसचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. येरवडा परिसरामध्ये एसटी महामंडळाची शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. (Shivshahi bus caught fire)
पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. यवतमाळहून चिंचवडकडे ही बस आली होती. शास्त्रीचौकात पोहोचल्यानंतर शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली.
त्यानंतर गाडीतील सर्व 42 प्रवाशांना खाली उतरण्यास सांगितलं. काही मिनिटात सर्व प्रवासी बसमधून खाली उतरले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटामध्ये बसने पेट घेतला. चालकाने वेळीच बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेत कुणालाही इजा झाली नाही. मात्र, बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, पुण्यातील लुल्ला नगर परिसरात असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलला आग लागली आहे. इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.