मुंबई,दि.१६: राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात शिवसेना-राष्ट्रवादी फुटीमुळे राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात भूमिका घेत थेट पक्षावर दावा सांगितला आहे. आता पुन्हा एकदा दसरा-दिवाळीत राज्यात आणखी एक राजकीय धमाका होऊ शकतो असा दावा राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे.
मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, दसरा-दिवाळी जवळ आलीय त्यामुळे धमाका सुरु झालाय. त्यामुळे कदाचित जसं अजित पवारांच्या नेतृत्वात ९ मंत्र्यांनी शपथ घेतली तसेच पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमडळ विस्तार होईल. शरद पवार गटातील काही नेते महायुतीत येण्यास इच्छुक आहेत. बरेच नेते आहेत त्यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांशी चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांचा निर्णय होत असेल म्हणून मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब लागतोय असं देसाईंनी सांगितले.
त्याचसोबत एखादा मोठा नेता किंवा आमदारांचा एक गट जर महायुतीला समर्थन देण्यासाठी सरकारमध्ये येत असला तर आम्ही त्यांचे स्वागत करू असंही मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाला चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचा मोठा नेता महायुतीत सहभागी होऊ शकतो असं मंत्र्यांनी म्हटल्याने हा मोठा नेता कोण आहे याचीच कुजबुज सुरु झाली आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याबाबत तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली असून दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या २९ मंत्री कॅबिनेट आहेत. त्यातील भाजपचे १०, शिंदे यांच्या शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादीचे ९ मंत्री आहेत, एकूण मंत्री संख्या जास्तीत जास्त ४३ राहू शकते. याचा अर्थ आणखी चार राज्यमंत्र्यांसह १४ जणांचा समावेश होऊ शकतो.