सोलापूर,दि.5: ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाशी संबधित गट क संवर्गाची पदभरती परिक्षा दिनांक 7 व 8 ऑक्टोबर 2023 तसेच दिनांक 10 व 11 ऑक्टोबर 2023 या कालावधीत असल्याने सर्व परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात शांतता, कायदा व सुव्यस्था अबाधित रहावी. परिक्षा शांततेच्या व तणावमुक्त वातावरणात पार पाडावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.
यानुसार पुढील प्रतिबंधात्मक आदेश लागू होत आहेत. परीक्षा केंद्राच्या परीसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा, नारेबाजी, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, भाषण करण्यास मनाई आहे. परीक्षा केंद्राचे निषिध्द क्षेत्रात झेरॉक्स सेंटर, फॅक्स, एस.टी.डी. बुथ, परिक्षा कालावधीत बंद राहतील. तसेच परीक्षा केंद्रात व परिसरात मोबाईल फोन,लॅपटॉप, पेजर, टेपरेकॉर्डर, कॅमेरा आदींचा वापर करता येणार नाही. निषिध्द क्षेत्रात पाच पेक्षा जास्त इसम एकत्र येणार नाहीत. शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, बंदुका, सुरे, लाठ्या, काठया तसेच शारीरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर ठेवता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेता येणार नाही. परिक्षा केंद्रापासून 200 मीटर अंतरावर चुण्याची लाईन आखण्यात यावी.
सदर आदेश कर्तव्ये बजावणारे वरिष्ठ अधिकारी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना लागू राहणार नाही. पोलीस आयुक्त सोलापूर शहर व पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी परिक्षा कालावधी दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करुन आवश्यक पोलीस बंदोबस्त लावण्याची कार्यवाही व जबाबदारी पार पाडावी.
परिक्षा केंद्रांचे नांव: 1)सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गेट नं. 38/1/ बी, पुणे हायवे, केगांव सोलापूर. 2) परम इन्फोटेक, श्री सिध्देश्वर महिला इंजिनिअरिंग कॉलेज, प्लॉट.नं.74, भवानी पेठ, रुपा भवानी मंदीर रोड, सोलापूर. 3) सोलापूर डिजिटल हब, गेट नं.16/1, बार्शी रोड,सोलापूर
अधिसूचनेतील कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द फौजदारी नियमांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येईल.सदर अधिसूचना परिक्षेच्या कालावधीपुरती अमलात राहील. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.