काँग्रेस आमदारांसंदर्भात भाजपा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा गौप्यस्फोट

0

सोलापूर,दि.30: खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी काँग्रेस आमदारांसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस आमदारांमध्ये (Congress Mla) अस्वस्थता आहे. त्यामुळं लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील, असा दावा माढा लोकसभेचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (MP Ranjeetsingh Naik Nimbalkar) यांनी केलाय. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असाही गौप्यस्फोट देखील खासदार निंबाळकर यांनी केला आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा गौप्यस्फोट

काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जावून काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असे खासदार निंबाळकर यांनी सांगितले. माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे लोकार्पण खासदार निंबाळकर यांच्या आणि माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, श्रीपूर ते खंडाळी या रस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम हा माळशिरस तालुक्यात असूनही मोहिते पाटील यांच्या अनुपस्थितीमुळे पुन्हा निंबाळकर मोहिते वादाच्या चर्चेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांचे विरोधक समजले जाणारे राष्ट्रवादीचे उत्तम जानकर यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हजर होते. मात्र, मोहिते पाटील यांनी त्यांच्याच तालुक्यात झालेल्या या विकासकामांच्या उद्घाटनाकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here