नवी दिल्ली,दि.17: देशासह राज्यातून अद्याप पावसाने (Monsoon) पूर्णपणे माघार घेतलेली नाही. राज्यासह देशाच्या काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पश्चिम भारतात पुढील 48 तास पावसाची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाने म्हटलं आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरात, राजस्थान या राज्यांमधून मान्सून परतला आहे.
ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून केरळला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिरुवअनंतपुरमसह आसपासच्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळमधील कोल्लम, पठाणमथिट्टा, अलप्पुझा आणि इडुक्की जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. हवामान विभागाने नागरिकांना खबरदारीचा उपाय करण्याचे आवाहन केले आहे. पाणी साचलेल्या भागात, कच्चा रस्ते अशा ठिकाणी जाणं टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आज आणि उद्या जोरदार पावसाची हजेरी
भारतीय हवामान विभागाने (IMD) 17 आणि 18 ऑक्टोबरला काळात देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान खात्याने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख येथे काही ठिकाणी मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.
बर्फवृष्टीमुळे पर्वतीय भागात पारा घसरला
जम्मू, काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे पारा घसरला आहे. लडाखमधील द्रास येथे सोमवारी हंगामातील पहिली हिमवृष्टी झाली, यामुळे किमान तापमान उणे 5.8 अंशांवर पोहोचलं. देशाच्या वायव्य भागात मंगळवारपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशात आज काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे.
आज महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, देशातील अनेक भागातून मान्सूनने पूर्णपणे माघारी घेतली आहे.यामुळे तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्येही तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. दिल्लीमध्ये थंडीची चाहूल लागली आहे.