नवी दिल्ली,दि.९: Rahul Gandhi On Modi Govt: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारचे समर्थन केले आहे. एकीकडे देशात जी-२० शिखर परिषद सुरू आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली प्रथमच या संमेलनाचे आयोजन होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अनेक देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) परदेश दौऱ्यावर आहेत. बेल्जियम दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी तेथे संबोधित करताना एका मुद्द्यावर केंद्रातील मोदी सरकारचे (Modi Govt) समर्थन केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले मोदी सरकारचे समर्थन | Rahul Gandhi On Modi Govt
रशिया-युक्रेन संघर्षावर भारताच्या सध्याच्या भूमिकेशी संपूर्ण विरोधक सहमत असतील. रशियाशी आमचे संबंध चांगले आहेत. मात्र, आताच्या घडीला सरकार जे मांडत आहे, त्यापेक्षा विरोधकांची काही वेगळी भूमिका असेल असे मला वाटत नाही, असे सांगत रशिया-युक्रेन युद्धाबाबत भारताच्या भूमिकेचे राहुल गांधी यांनी समर्थन केले. चीनच्या मुद्द्यावर राहुल गांधी म्हणाले की, चीन एक विशेष दृष्टिकोन मांडत आहे. चीन बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा विचार करत आहे. कारण ते जागतिक उत्पादनाचे केंद्र बनले आहे. पण मला आमच्या बाजूने कोणताही पर्यायी दृष्टिकोन दिसत नाही. राजकीय आणि पर्यायी दृष्टिकोन आपण कसा देऊ शकतो हे आपल्यासमोर आव्हान आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
केंद्र सरकार विरोधी नेत्यांना महत्त्व देत नाही
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना जी-२० डीनरसाठी आमंत्रित न केल्याबद्दल सरकारवर निशाणा साधला. ६० टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विरोधी नेत्यांना सरकार महत्त्व देत नाही, याचा हा पुरावा आहे, असे ते म्हणाले. भारतात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विचारांचा लढा सुरू असून, लोकशाही संस्था आणि स्वातंत्र्यावरील हल्ले थांबतील यासाठी विरोधी पक्ष काम करतील, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, जी-२० परिषदेनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली येथे उपस्थित असलेल्या सर्व राष्ट्रप्रमुखांसाठी शनिवारी डीनरचे आयोजन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना निमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्रीही राष्ट्रपतींच्या डीनरला उपस्थित राहणार नाहीत. आम्ही कोणत्याही पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रण पाठवलेले नाही, असे सरकारने स्पष्ट केले.