छगन भुजबळ यांची काळ्या अन् पांढऱ्या दाढीवाल्यांवरुन टोलेबाजी

0

मुंबई,दि.18: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Session) आज दुसरा दिवस सुरु आहे. अधिवेशन म्हटलं की टोलेबाजी आणि जुगलबंदीचा खेळ हा ठरलेला असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा जुना अंदाज आज विधानसभेत पुन्हा पाहायला मिळाला. आपल्या खुमासदार शैलीनं भुजबळ यांनी विधानसभेचा आजचा दिवस गाजवला. शेलक्या शब्दात भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यावेळी काळी दाढी आणि पांढरी दाढी याचा उल्लेख करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही मिश्किल टिप्पणी केली. 

“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले याचा मला मनापासून आनंद आहे. पण मला आनंद वेगळ्याच गोष्टीमुळे झाला आहे. काळी दाढी असणारे ते राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. देशात सध्या माझ्यासारख्या पांढऱ्या दाढीचा प्रभाव आहे. देशात पांढरी दाढी आणि राज्यात काळी दाढी प्रभावशाली ठरते आहे. पण जीएसटीवरुन लोकांच्या भावना काय आहेत त्याही केंद्रात तुम्ही सांगा. तुम्हाला केंद्रात खूप वजन आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले.  

छगन भुजबळ यांनी शाळेतील पुस्तकांवरील जीएसटीवर बोलताना सरकारवर ताशेरे ओढले. त्यांनी म्हटलं की, नशीब आमचं की तुम्ही भाषणावर जीएसटी लावली नाही. नाहीतर एक मिनिट बोलले तर जीएसटी लावतील. आम्ही पेपरात वाचलं की फडणवीस यांची ताकद वाढली आहे. केंद्राच्या कुठल्या तरी समितीवर त्यांची नियुक्ती झाली आहे. जरा तिथे जाऊन सांगा अन्नधान्यावर जीएसटी लावू नका, असं भुजबळ म्हणाले. पुढं बोलताना त्यांनी आपला मोर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे वळवला.

यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जीएसटी संदर्भात जे काही बदल झाले आहे त्यानुसार आपण हे बिल आणलं आहे. भुजबळसाहेब हे लोकसभेतलं भाषण होतं पण ते आपण विधानसभेत केलं. आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान केला जातो, असंही फडणवीस म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here