दि.१८: भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत सूचक ट्विट केले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये प्रफुल्ल पटेल नेमके कशामुळे धक्क्याला लागणार? असे म्हटले आहे. यापूर्वी भाजपाचे मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा नेता तुरुंगात जाणार असे ट्विट केले होते. तसेच मोहित कंबोज यांनी सिंचन घोटाळा प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता भाजपच्या निशाण्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचा बडा नेता आता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना भेटायला जाईल, असे ट्विट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केले होते. त्यानंतर राजकीय राजकारणात खळबळ उडाली आहे. यातच आता प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत भाजपने ट्विट करत कोणत्या प्रकरणात कारवाई होणार, असा प्रश्न केला आहे.
भाजप नेते मोहित कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच चांगलीच आक्रमक झाली असून, मोहित कंबोज आणि भाजपविरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रफुल्ल पटेल यांचे नाव घेत टीकास्त्र सोडले आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रफुल पटेल नेमके कशामुळे धक्क्याला लागणार? FIFA कांड की CJ house प्रकरणामुळे? अशी विचारणा करत, हिसाब तो होके रहेगा…, असे ट्विट केले होते. तत्पूर्वी, फुटबॉलची जागतिक संघटना फिफाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी लादली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) माजी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल या साऱ्या वादाला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने कारवाई करत मुंबईतील वरळी येथील सीजे हाउस या आलिशान इमारतीतील चार मजल्यांवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली आहे. हे प्रकरण ड्रग माफिया इक्बाल मिर्ची याच्याशी निगडित असून, या प्रकरणी ऑक्टोबर २०१९ मध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रफुल्ल पटेल यांची १२ तास चौकशी केली होती. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाणा साधलाय.