बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार निवडून येणार का? रोहित पवार स्पष्ट म्हणाले…

0

मुंबई,दि.१०: बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार निवडून येणार का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी स्पष्टपणे उत्तर दिले आहे. अजित पवारांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादीत व पवार कुटुंबात फूट पडली आहे. अजित पवार बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात तर सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसमधील या फुटीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणते नेते कोणत्या विधानसभा, लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात असून, रोहित पवार यांनी यावर भाष्य केले आहे. 

काय म्हणाले रोहित पवार?

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे बारामतीत काय होणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मीडियाशी बोलताना रोहित पवार यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार असा सामना होणार का, असे रोहित पवार यांना विचारण्यात आले. यावर बोलताना, बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध पार्थ पवार निवडणूक होणार नाही, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले. 

सुप्रिया सुळेच निवडून येणार

अजितदादा तशी भूमिका घेणार नाहीत. बारामती विधानसभेवर फक्त अजितदादाच निवडून येऊ शकतात. दुसरे कुणी नाही. अजितदादा कुटुंबाच्या बाबतीत तशी भूमिका घेणार नाहीत. अजित पवार यांच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही, माझ्या कुटुंबातील कुणीही निवडणुकीला उभे राहणार नाही, अजितदादांनी केलेल्या कामावर दादाच निवडून येणार, लोकसभेला पण कुणी कितीही प्रचार केला तरी सुप्रिया सुळे निवडून येणार, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलू नये, मोठे नेते आपापसात गुंतवून राहावेत, यासाठी भाजपने आधी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. आम्ही आमच्यातच उत्तर-प्रत्युत्तर देत आहोत आणि तिकडे भाजप बाजुला राहत आहे. पक्ष फोडण्याचे खापर अजितदादांवर फोडले जात आहे. अजित दादांना व्हिलेन ठरवण्याचे काम चार-पाच नेते करत आहेत. तिकडे भाजप एसीत बसून मजा पाहत आहे आणि आम्ही आमच्यातच भांडतोय, अशी टीकाही रोहित पवार यांनी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here