“गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा…” मनोज जरांगे पाटील

0

मुंबई,दि.९: मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत एक मोठी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच गुन्हे मागे घेतले नाही तर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा उघडे पाडू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच २४ डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही मिळाले, तर तिथून पुढे सरकारला पश्चाताप करावा लागेल, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

तुडवायला वेळ लागणार नाही

माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना जरांगे पाटील म्हणाले, “सरकार आरक्षणाचा विषय किती गांभीर्याने घेत आहे, हे माहीत नाही. पण २४ डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण मिळणार हे शंभर टक्के सांगतो. आमच्या मुलांचे भवितव्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आम्ही मोठे केलेले नेते जर आमच्याविरोधात जायला लागले, तर त्यांना पायाखाली तुडवायला आम्हाला वेळ नाही लागणार. महाराष्ट्रातला मराठा काय आहे? हे त्यांना लक्षात येईल. सरकार हा विषय प्रामुख्याने का घेत नाही, याच्यावर आमचे बारकाईने लक्ष आहे. गुन्हे मागे घेण्याबाबत आम्हाला काय आश्वासन दिले, आरक्षणासाठी काय आश्वासन दिले, यावर आमचे लक्ष आहे.”

.. तर पश्चाताप व्यक्त करावा लागेल

“माझा मराठा समाज गरीब असला, शेतात राबणारा असला तरी त्याचे सरकार, लोकप्रतिनिधीवर बारकाईने लक्ष आहे. एकदा २४ डिसेंबरची मुदत होऊन जाऊ द्या. मग पुढे महाराष्ट्रातला मराठा समाज काय आहे? हे त्यांना दाखवून दे. सरकारने काय समजायचे ते समजावे. आमच्या संयमाची परिक्षा घेऊ नये. आमचे आंदोलन शांततेतच होईल, पण सरकारला पश्चाताप करावा लागेल, अशी काहीतरी कृती करू”, असेही ते म्हणाले.

मर्यादा सांभाळून बोलावे

छगन भुजबळ यांची आज इंदापूर येथे सभा होत आहे. याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “त्यांना सभा घेण्याचा अधिकार आहे. पण त्यांनी जातीय तेढ निर्माण करू नये. भुजबळ घटनात्मक पदावर बसले आहेत. ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यासारख्या नेत्याने दंगलीची भाषा, कुऱ्हाडी-कोयत्याची भाषा करून राज्यात जातीय तेढ निर्माण करू नये. मराठा आरक्षणावर त्यांनी बोलू नये. नाहीतर पुढे त्यांना दाखवून देऊ.”

फडणवीस यांना रोषाला सामोरे जावे लागेल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात जालन्यातील आंतरवाली सराटी येथील आंदोलनाबाबतची माहिती दिली. यात आंदोलकांपेक्षा पोलिसच अधिक जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ लाठीमार केला होता, असेही ते म्हणाले होते. याबाबतचा प्रश्न विचारला असता जरांगे पाटील म्हणाले की, ते त्यांच्या मूळ भूमिकेवर येतील. ते जर मूळ भूमिकेवर नाही आले, तर त्यांना मराठा काय आणि महाराष्ट्र काय हे लक्षात येईल. कुणाचे तरी ऐकून (भुजबळ) फडणवीस यांनी भूमिका बदलली, याचा त्यांना पश्चाताप होईल.

“आम्ही मागेही दूध का दूध, पाणी का पाणी करू. दोन तीन दिवस वाट पाहू. फडणवीस यांना मराठे पुन्हा एकदा उघडे पाडणार, ते खोटे बोलले आहेत. त्यांना रोषाला सामोरे जावे लागणार. त्यांनी आम्हाला समजून घ्यावे. फडणवीस यांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता मराठ्यांचा विचार करावा. जर आमची गरज नसेल तर पुढे आम्ही कोण आहोत? हे दाखवून देऊ”, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here