तेलंगणात याकारणामुळे भाजपा आमदारांचा शपथविधीस नकार

0

मुंबई,दि.९: तेलंगणात भाजपा आमदारांनी शपथविधीस नकार दिला आहे. तेलंगणात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवलं असून बीआरएसला सत्तेतून पायउतार व्हावे लागलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसच्या रेवंथ रेड्डी यांनी शपथ घेतली असून काँग्रेसचं सरकार स्पष्ट बहुमताने स्थापन झालं आहे. येथील निवडणुकीत एमआयएमनेही ८ जागांवर विजय मिळवला असून एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हेही पुन्हा एकदा आमदार बनले आहेत. त्यातच, अकबरुद्दीन ओवैसी यांनी आज प्रोटेम स्पीकर म्हणून शपथ घेतली. मात्र, भाजपने त्यांच्या या शपथविधीला विरोध केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अकबरुद्दीन ओवैसींचा प्रोटेम स्पीकर म्हणून शपथविधीही झाला. मात्र, त्यास भाजपने विरोध केला आहे, भाजपा नेते आणि केंद्रीयमंत्री जी. किशन रेड्डी यांनी अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर बनवण्यास भाजपाचा विरोध असल्याचे म्हटले. तसेच, अनेक वरिष्ठ आमदार असताना, त्यांना बाजुला ठेऊन अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर नियुक्त करणे चुकीचं असल्याचंही त्यांनी म्हटलं.

सध्या तेलंगणातील निवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सुरू आहे. काँग्रेससह इतरही पक्षाच्या आमदारांकडून पद व गोपनियतेची शपथ घेतली जात आहे. मात्र, भाजपाच्या आमदारांनी शपथ घेण्यास नकार दिला आहे. नियमित स्पीकर/ विधानसभा अध्यक्ष आल्यानंतरच आम्ही शपथ घेणार असल्याची भूमिका भाजपा आमदारांनी जाहीर केली आहे. तसेच, राज्यपालांकडून जाऊन अकबरुद्दीन ओवैसींच्या प्रोटेम स्पीकरपदाला विरोध असल्याचे पत्र देणार आहोत, असेही भाजपने स्पष्ट केले आहे. 

काँग्रेसने एमआयएमचे सहकार्य मिळवण्यासाठी अकबरुद्दीन ओवैसींना प्रोटेम स्पीकर नियुक्त केले आहे. मात्र, वरिष्ठ व अनुभवी नेत्यांना प्रोटेम स्पीकर बनवण्याची परंपरा आहे, असेही रेड्डी यांनी म्हटले.

दरम्यान, तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे ८ आमदार निवडून आले आहेत. गत निवडणुकीत भाजपाचा तेलंगणात केवळ १ आमदार निवडून आला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here