अमरावती,दि.28: आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी शरद पवार यांच्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे सांगितले आहे. बच्चू कडू यांना शिंदे सरकारमध्ये मंत्रीपद मिळाले नाही. बच्चू कडू महायुतीवर नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना कडू यांनी निमंत्रण दिल्यानंतर पवारांनी कडू यांच्या घरी भेट दिली.
शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू आता एकनाथ शिंदेंना धक्का देणार की काय? अशा चर्चाही रंगल्या. आता बच्चू कडू यांनीच भेटीदरम्यान नेमकं काय घडलं याविषयी सांगितलं आहे. आमदार बच्चू कडू यांच्या घरी शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांना संत गुलाबराव महाराज यांचं ग्रंथ आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिमा भेट देऊन बच्चू कडू आणि नयना कडू यांनी त्यांचं स्वागत केलं.
बच्चू कडू यांनी अमरावतीत बोलत असताना शरद पवारांसोबतच्या भेटीविषयी सांगितलं. शरद पवार यांच्यासोबत थोडी राजकीय आणि सामाजिक चर्चा झाली. पण जास्त शेतीवर चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही जर झाली असेल तर तुम्हाला सांगायचं काही कारण नाही. बऱ्याच गोष्टी उघड करायच्या नसतात तेवड ताळतंब्य ठेवावं लागतं.
पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम हे रोजगार हमी योजनेत व्हावे. हे तुमच्या अजेंड्यामध्ये असावं हे मी सांगितलं. त्यामुळे शिंदे साहेब आहे तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. शिंदे साहेब सोबत नसतील तेव्हा बघू. अजून आकाशात ढगच आले नाही. ढग येऊ द्या मग पाहू. असं म्हणत बच्चू कडूंनी राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला.