मुंबई,दि.३: Nitin Desai News: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याआधी त्यांनी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. त्या त्यांनी परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.
स्टुडिओचा ताबा देऊ नका | Nitin Desai News
कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे त्यांनी क्लिपमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.
कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे.
देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठविल्याचे समजते.
एनडी स्टुडिओतच पार्थिवावर अंत्यसंस्कार
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यावेळी बोलवण्यात आले. तसेच डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते. जे जे रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एनडी स्टुडिओतच शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.