Sanjay Raut On Nitin Desai: नितीन देसाईंची आत्महत्या; संजय राऊत यांचे गंभीर आरोप

0

मुंबई,दि.३: Sanjay Raut On Nitin Desai: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन देसाईंसारखा कलाकार ज्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा सिनेइंडस्ट्रीत कष्टाने, मेहनतीने उमटवला. या देशातील सर्वात उत्तम स्टुडिओ त्यांनी उभारला. अनेक चित्रपटांची निर्मिती केली. अशा या महान कलाकाराचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू व्हावा. त्यांना मृत्यूला कवटाळावं लागले. नितीन देसाई यांनी आत्महत्या करताना जी व्हाईस नोट आहे ती समोर आणली पाहिजे. जे प्रामाणिक उद्योगपती आहेत त्यांना सध्याच्या काळात कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते हे देशाला, महाराष्ट्राला कळाले पाहिजे अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

एक हरहुन्नरी मराठी माणूस मात्र कर्ज फेडू शकत नाही | Sanjay Raut On Nitin Desai

खासदार संजय राऊत म्हणाले की, एकाबाजूला या देशातून हजारो कोटी रुपये घेऊन पळतायेत, बँकांना बुडवतायेत. भाजपासोबत जे आहेत अशा लोकांना कर्जमाफी दिली जाते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. परंतु एक हरहुन्नरी मराठी माणूस मात्र कर्ज फेडू शकत नाही. जे स्वप्न एनडी स्टुडिओ विखुरताना दिसतंय हे त्यांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. आपल्यासमोर आपले स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसतेय म्हणून आत्महत्या केली. ते देश सोडून पळाले नाही. त्यांनी कुणाला फसवले नाही हे महत्त्वाचे. नितीन देसाईंचे स्वप्न हे मराठी माणसाचे होते. नितीन देसाईंची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी. कर्जतच्या स्टुडिओला चित्रनगरीचा दर्जा द्यावा असंही ते बोलले.

राजकीय दबाव

१६ आमदार कायद्याने अपात्र होतायेत पण त्यांना अपात्र करण्याची हिंमत विधानसभा अध्यक्षांमध्ये दिसत नाही. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद असले तरी सध्या सर्व घटनात्मक पदे राजकीय दबावाखाली काम करतायेत. हे राष्ट्रपती, राज्यपाल यासारख्या अनेक पदांमध्ये दिसून येते. त्यामुळे आम्हाला चंद्रचूड यांच्या खंडपीठातील सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. आम्ही ११ ऑगस्टपर्यंत वाट पाहतोय. आमची कायदेशीर टीम अत्यंत मजबूत आहे. आम्ही आशावादी नाही तर विश्वास आहे. विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय १० व्या सूचीनुसार घ्यावा लागतो. नाहीतर महाराष्ट्रातसुद्धा काही लोकांनी कायद्याचा आणि घटनेचा खून केला अशी इतिहासात नोंद होईल असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मणिपूरबाबत बैठक घ्यावी. मणिपूरचा हिंसाचार ही जागतिक समस्या झाली आहे. सर्व बैठकांना त्यांना वेळ आहे. मग मणिपूर, हरियाणातील हिंसाचारावर संसदेत मोदींनी बोलावे. महाराष्ट्रात द्वेष पसरवणाऱ्या भाषणावर बोलावे. देशात कुठलाही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये ही सर्वांची जबाबदारी आहे. ज्या राज्यात निवडणुका येतात तिथे हिंसाचार सुरू होतो. हे लोक कोण आहेत? आम्हीही प्रखर हिंदुत्ववादी आहोत. पण याप्रकारचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही असं सांगत राऊतांनी भाजपावर निशाणा साधला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here