सोलापूर,दि.16: Namo Shetkari Mahasanman Nidhi: सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना 2023-24 पासून राबविण्यास मान्यता देण्यात आली असून, या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
Namo Shetkari Mahasanman Nidhi | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
“नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या PM-KISAN योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर थेट हस्तांतरणाव्दारे आयुक्त ( कृषि ) यांच्या मार्फत वितरीत कण्यात येईल. यामध्ये पहिला हप्ता माहे एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता माहे ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता माहे डिसेंबर ते मार्च प्रति हप्ता रू. 2000 प्रमाणे लाभ वितरीत करण्यात येईल.
या योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाण म्हणून गृहित धरण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत पी. एम. किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. तसेच केंद्र शासनाने लाभार्थी पात्रतेबाबत वेळोवेळी निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ परिणामाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना देखील लागू होतील. पी. एम. किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील या योजनेचे लाभार्थी राहतील.