सोलापूर,दि.१३: निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता टिकवून ठेवण्यासाठी आणि मतदारांचा निवडणूक व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने सोन्या मारुती चौक येथील पक्षाच्या कार्यालयात सह्यांची मोहीम राबवण्यात आली. ‘एक सही संतापाची, एक सही लोकशाही वाचविण्यासाठी!’ या घोषवाक्याखाली पार पडलेल्या या आंदोलनात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या.
प्रमुख मागण्या:
विशेष सखोल मतदार पुनरावलोकन (SIR) प्रक्रिया तातडीने रद्द करावी.
मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (EVM) पारंपरिक मतपत्रिकेचा (Ballot Paper) वापर करावा.
अत्यंत स्वच्छ आणि निष्पक्ष मतदार याद्या तयार कराव्यात.
निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना विश्वासात घेऊनच संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवावी.
पारदर्शक व्यवस्थेची गरज
“निवडणूक हा लोकशाहीचा मुख्य आधार असून, या प्रक्रियेवरील मतदारांचा विश्वास टिकवणे ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी आहे. सद्यस्थितीत निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात निर्माण झालेला असंतोष आणि शंका दूर करण्यासाठी अधिक पारदर्शक व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे,” अशी भूमिका मनसेने या वेळी मांडली.
नागरिकांच्या या तीव्र भावना शासन आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली असून, लोकशाहीच्या मार्गाने या मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी व्यक्त केला.
विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
या मोहिमेस मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह इतर मित्रपक्षांच्या नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला. यामध्ये विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे, प्रशांत इंगळे, जैनुद्दीन शेख, महेश धाराशिवकर (शिवसेना), अभिषेक रंपुरे, सत्तार सय्यद, प्रसाद कुमठेकर, निलेश भंडारे, जितेंद्र टेंभुर्णीकर, राजू कुरेशी (राष्ट्रवादी काँग्रेस), शेरू कुरेशी, जयश्री हिरेमठ, शोभाताई साठे, अनिल भिसे, गणेश पाटील, आकाश निंबाळकर, अनिकेत उपासे, गणेश भोसले, समर्थ ओझा, द्वारकेश पटणे, अभिषेक इरकल, वैभव धोत्रे, सैफन जमखंडी, गोविंद बंदपट्टे, सोपान महिंद्रकर, आकाश राठोड, शफीक शेख आणि विनायक माढेकर यांच्यासह पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








