सोलापूर,दि.१३: नवरात्रोत्सवात घराघरांत आदिशक्तीची पूजा, आरती आणि उपवास केला जातो. मात्र, ज्या मातांच्या पोटी नव्या जीवाचा जन्म होतो, त्या जिवंत देवींचा सन्मान करणे आणि त्यांच्या नवजात बाळाची काळजी घेणे हीच खरी देवीपूजा होय—असा माणुसकीचा संदेश देत ‘आस्था रोटी बँक, सोलापूर’ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. आस्था रोटी बँकेचे संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कन्यारत्नाला जन्म देणाऱ्या मातांना तसेच गरजू प्रसुत मातांना नवजात बाळासाठी आवश्यक साहित्य, स्वच्छतेच्या वस्तू व इतर उपयोगी सामग्री असलेले ‘बेबी किट’ प्रेमाची भेट म्हणून वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नवमातांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, तर उपस्थितांमध्येही माणुसकीची भावना अधिक दृढ झाली.
या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऋत्विक देविदास जयकर, डॉ. शशिकला जगताप, ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने’चे वैद्यकीय समन्वयक अनंत जवंजाळ तसेच वैद्यकीय शिबिर समन्वयक स्वप्नाली सांगोलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ऋत्विक देविदास जयकर यांनी आस्था रोटी बँकेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. “समाजातील तळागाळातील गरजू व्यक्तींना मदतीचा हात देण्याचे कार्य आस्था रोटी बँक सातत्याने करत असून, या समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने माणुसकी जपली आहे,” असे सांगत त्यांनी आस्था रोटी बँकेचे मनःपूर्वक आभार मानले.
“एका नवदुर्गेचे आगमन… आणि दुसऱ्या नवदुर्गेचा सन्मान!”
या भावनेतून राबवण्यात आलेल्या उपक्रमाद्वारे ‘मुलगी जन्माला येणे हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे’ असा सकारात्मक संदेश देण्यात आला. मुलगी म्हणजे ओझे नसून घरात आलेली लक्ष्मी आणि भविष्यातील नवदुर्गा आहे, हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
आर्थिक अडचणींमुळे अनेक कुटुंबांना नवजात बाळाच्या सुरुवातीच्या गरजा पूर्ण करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत एका छोट्याशा मदतीतूनही मातेच्या मनाला मोठा आधार मिळू शकतो. याच उद्देशाने आस्था रोटी बँकेने अन्नदानाच्या कार्यासोबतच मातृत्वाचा सन्मान आणि नवजात बाळांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा हा उपक्रम हाती घेतला. यावेळी आस्था रोटी बँकेच्या कार्यकर्त्यांनी नवमातांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली आणि त्यांना धीर दिला.
आस्था रोटी बँक गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब, गरजू, निराधार, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नदानासह विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. “अन्न वाया घालवायचे नाही आणि कोणालाही उपाशी ठेववायचे नाही” या ब्रीदवाक्यासोबतच गरजूंच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे कार्य ही संस्था सातत्याने करत आहे.
या कार्यक्रमास आस्था रोटी बँकेचे सदस्य विद्या सिंघम, सविता जोशी, चंचला खरात, आनंद खरात, विनोद भोसले, रवींद्र गोयल, सत्यम सोलापूरकर, प्रकाश डोंगरे, विजय छचुरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद भोसले यांनी केले, तर आभार सविता जोशी यांनी मानले.
देवीच्या मूर्तीसमोर दिवा लावणे ही श्रद्धा आहे; पण एका नवमातेच्या चेहऱ्यावर आनंदाचा दिवा लावणे ही खरी माणुसकी आहे!
नवरात्रात देवीची पूजा करण्यासोबतच जिवंत देवी असलेल्या प्रत्येक मातेचा आणि नव्याने जन्मलेल्या कन्येचा सन्मान करूया, असा भावस्पर्शी संदेश आस्था रोटी बँकेच्या या उपक्रमातून देण्यात आला.








