भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे?

0

मुंबई,दि.18: भाजपा आणि शिंदे गटाच्या अनेक नेत्यांना अजित पवार युतीत नकोसे झाल्याचे वृत्त आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. राज्यात शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी तर भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती अशी लढत झाली. 

अजित पवार युतीत नकोसे?

अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी तसेच एकनाथ शिंदेंच्या गटातील उमेदवार पिछाडीवर होते. सोलापुरातील मोहोळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार असूनही येथे विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांना 63152  इतके मताधिक्य मिळाले आहे. भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला. 

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पराभव झाला. येथून शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले आहेत. अजित पवार गटाचे संजय शिंदे आमदार असलेल्या मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवाराने 41 हजारांहून अधिकचं मताधिक्य मिळवलं. 

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे चार आमदार आहेत. येथून भाजपाच्या डॉ. भारती पवार यांचा पराभव झाला आहे. त्यांचा 1 लाख 13 हजारांहून अधिक मतांनी पराभव झाला. भारती पवार या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री होत्या. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाचे भास्कर भगरे विजयी झाले आहेत. 

भाजपच्या आमदारांना आता अजित पवार महायुतीत नकोसे झाले आहेत. अजित पवारांना सोबत घेतल्याने लोकसभेत फटका बसल्याचे भाजपच्या काही आमदारांचे मत आहे. अजित पवार गटाची मते भाजप उमेदवाराला मिळाली नसल्याचे भाजप आमदारांनी मत व्यक्त केल्याचे समजते. पराभवाचे खापर आता अजित पवार गटावर फोडण्यात येत आहे. भाजपसह शिंदे गटाला अजित पवार गटाचा फायदा झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

माढा, सोलापूर, दिंडोरी, मावळ, शिरूर आदी मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या आमदारांच्या मतदारसंघांमध्येही बहुतेक ठिकाणी भाजप आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना फटका बसल्याचे चित्र आहे. इतर मतदारसंघातही अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि नेते सक्रिय नसल्याचा दावा करण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here