मुंबई,दि.18: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांविरुद्ध तक्रार केली आहे. लोकसभा निवडणूक निकालापूर्वी शेअर बाजारासंदर्भात केलेल्या विधानामुळे अमित शाह यांना फटका बसण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर होण्यापूर्वी म्हणजे 3 जून रोजी शेअर बाजारात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. यामागचं कारण आहे अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानं असल्याचे सांगितले जात आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही एका मुलाखतीत शेअर बाजाराबाबत भाकित केले होते. 4 जून 2024 रोजी शेअर बाजारात तेजी येईल असे ते म्हणाले होते. एक्झिट पोलमध्येही भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल असे दाखवण्यात आले. त्यामुळे बाजार दोन दिवस ऑल टाईम हायला गेला. परंतु मतमोजणीच्या दिवशी मात्र मोदी-शाह यांचे भाकित खोटं ठरलं आणि बाजारात घसरण झाली.
आज मुंबईमधील ‘सेबी’च्या कार्यालयामध्ये जाऊन ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेत एक्झिट पोल घेणाऱ्या संस्था, निकालांआधी बाजारामध्ये मोठ्याप्रमाणात झालेली खरेदी, त्यानंतर निकालाच्या दिवशी बाजार पडल्याने झालेलं लाखो कोटींचं नुकसान या साऱ्याचं राजकीय नेत्यांशी काही कनेक्शन आहे का याचा तपास केला जावा अशी मागणी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना निकालाच्या तारखेच्या म्हणजेच 4 जून अधिक शेअर्स खरेदी करण्याचं विधानं अनेकदा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही तक्रार करण्यात आली आहे.
एकाच महिलेला झाला नफा
‘सेबी’च्या अधिकाऱ्यांच्या या भेटीसंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी नेमकं काय घडलं याची माहिती दिली. “लोकसभा निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलमधील आकडेवारीनंतर शेअर बाजार वधारला. या एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांचे राजकीय नेत्यांबरोबर काही संबंध आहेत का? पडलेला बाजार एक्झिट पोलच्या दिवशी वधारला आणि नंतर पुन्हा पडला. 24 तासांमध्ये गुंतवणूदारांना 30 लाख कोटींचं नुकसान झालं. मात्र चंद्रबाबू नायडूंच्या पत्नीला 521 कोटींचा नफा झाला. इतरही अनेक उदाहरणं आहेत ज्यात राजकीय नेते किंवा त्यांच्या कुटुंबियांनी भरपूर पैसा आणि नफा कमवला. निवडणुकांदरम्यान अमित शाहा अनेक सभांमध्ये अनेकदा म्हणाले की 4 तारखेआधी शेअर्स खरेदी करानंतर नफा मिळेल असं अनेकदा म्हणाले. आता ते देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का?” याची चौकशी करण्याची मागणी केली आहे, असं कल्याण बॅनर्जी म्हणाले.