मुंबई,दि.29: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी इशारावजा आवाहन केले आहे. कोरोनामुळे जगभरात अनेकांचा जीव गेला. कोरोना महाराष्ट्रासह देशात कमी झाला असताना कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने पुन्हा डोकेवर काढले आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात पुन्हा रूग्ण आढळत आहेत. तसेच नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण तयारी करत आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अनेकांनी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळं अनेकांनीच भटकंतीचे बेत आखले आहेत. पर्यटनस्थळं, गिरीस्थानं, वस्तूसंग्रहालयं, ऐतिहासिक वास्तू, खरेदीची ठिकाणं अशा एक ना अनेक ठिकाणांवर होणारी गर्दी आता वाढू लागली आहे.
काही पर्यटनस्थळांवर तर क्षमतेहून दुपटीनं गर्दी झाली आहे. पण, या परिस्थितीमध्ये एका संकटाचं सावट असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास हेच संकट जीवावर बेतू शकण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
कोरोनाच्या नवीन व्हेरियंटने चिंता वाढवली असताना अनेकजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तयारीत रंगले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विसर पडल्यामुळं त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे. त्यातच राज्यात सर्वसामान्य ताप, फ्लूची साथही असल्यामुळं अनेकांनाच ही समस्या भेडसावच आहे. पण, हा बेजबाबदारपणा इतरांनाही धोका पोहोचवू शकतो कारण ही वाढती गर्दी आणि नियमांची पायमल्ली पाहता करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक संभवतो.
तानाजी सावंत यांनी केले इशारावजा आवाहन
राज्यातील हे एकंदर चित्र पाहता पुढील किमान 10 – 15 दिवस आरोग्य यंत्रणेनेसोबतच नागरिकांनी सतर्क रहावें, असं इशारावजा आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे. सध्या राज्यात करोनाच्या ‘जेएन.1’ या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळत असल्यामुळं कोरोना टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. ज्यामध्ये राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती आणि आरोग्य विभागाच्या तयारी संदर्भात चर्चा झाली.
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. गंगाखेडकर यांनी बैठकीसंदर्भातील माहिती देत नवा व्हेरिएंट मोठा धोका निर्माण करेल अशी परिस्थिती सध्या नसली तरीही वयोवृद्ध आणि गंभीर आजाराच्या रुग्णांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं. राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.