मुंबई,दि.29: शिवसेना (उबाठा) नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीत लोकसभा जागा वाटपावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. राज्यातील 23 जागा लढवणार असल्याचे यापूर्वीच संजय राऊतांनी सांगितले आहे. 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.
खासदार संजय राऊत यांनी आपण 23 जागांवर ठाम असल्याचं आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावत दिल्लीत चर्चा सुरु असून, येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार? असं म्हटलं आहे. तसंच वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
पाच राज्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची तेलंगणा वगळता बाकीच्या राज्यात कामगिरी निराशाजनक होती. त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ज्या त्या राज्यातील स्थानिक पक्ष जास्त जागांची मागणी करू शकतात. देश पातळीवरही इंडिया आघाडीत काँग्रेसचे महत्व कमी झाले आहे.
“काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांशी आमची चर्चा सुरु आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, वेणुगोपाल, खर्गे यांच्याशी आमच्या पक्षाची, उद्धव ठाकरेंची चांगल्या प्रकारे संवाद सुरु आहे. आम्ही किती जागा लढणार ही चर्चा दिल्लीत होईल. येथील गल्लीतील लोक बोलल्यास कोण ऐकणार?आम्ही 23 जागा लढत आले असून, ती कायम ठेवू असंच म्हणालो आहोत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात एकही जागा जिंकली नसून, त्यांना शून्यापासून सुरुवात करायची आहे असंही ते म्हणाले.
नाना पटोले कोण?
“नाना पटोले कोण आहेत? जे बोलत आहेत त्यांच्याकडे काय अधिकार आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे मुंबईत असतात, त्यामुळे आमच्यात संवाद आहे. काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही दिल्लीत बोलू. काल आमची दिल्लीत, महाराष्ट्रातील अनेक प्रमुख नेत्यांशी आमची चर्चा झाली. आमची भूमिका स्पष्ट आहे. मी आजच बोलत नाही आहे,” असं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.
संजय राऊत स्पष्ट म्हणाले…
“आम्ही 23 जागांवर लढलो होतो आणि 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने हारलो होतो त्यामुळे 19 झाल्या. शिरुरची जागी आम्ही लढली तिथे आता राष्ट्रवादीचा खासदार आहे. आम्ही जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही हे धोरण ठरलं आहे. काँग्रेसने महाराष्ट्रात जागा जिंकल्याच नव्हत्या. पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिंकू शकतात, मदत होऊ शकते तिथे ते सोबत राहणारच आहेत. यावर दिल्लीचं हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे. त्यामुळे त्यावर जर राज्यातील कोणी बोलत असेल तर गांभीर्याने पाहण्याची गरज नाही,” असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.
“उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यात उत्तम संवाद आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खर्गे, राहुल गांधी, वेणुगोपाल यांच्यात चांगला संवाद आहे. आम्ही काय करायचं ते पाहू,” असंही ते म्हणाले.
आंबेडकरांचं नेतृत्व महाराष्ट्रात
“वंचितसोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. उद्धव ठाकरे, शरद पवारांचं म्हणणं आहे की, वंचित आघाडीचा कोअर सोबत असायला हवा. काँग्रेसचीही त्याला मान्यता आहे. प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व महाराष्ट्रात आहे. त्यांची भूमिका हुकूमशाही नष्ट करावी अशीच आहे. ते आणि आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिकाच मांडत आहोत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. 2024 मध्ये आम्ही परिवर्तन करुन दाखवू असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.