मुंबई,दि.२८: शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय होतं ते सर्वांनी पाहिलं आहे असे वक्तव्य शिंदे गटाच्या आमदाराने केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटल्यानंतर आता विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं आहे. पूर्वी हे पद राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्याकडे होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांना बरोबर घेत अजित पवारांनी वेगळा गट स्थापन केला आणि महायुतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं आहे. त्याचबरोबर शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचंही (शरद पवार) विधानसभेतलं सदस्यांचं संख्याबळ कमी झालं आहे. त्यामुळे आता विधानसभेत काँग्रेसचा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. परंतु काँग्रेसने अद्याप ही जबाबदारी कोणत्याही नेत्याकडे सोपवलेली नाही. काँग्रेसकडून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, विधानसभेत विरोधी पक्षनेता नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका होत आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनीही विरोधी पक्षांवर टीका केली आहे. आमदार गायकवाड म्हणाले, इतक्या दिवसांत विरोधी पक्ष त्यांचा नेता निवडू शकले नाहीत, हे विरोधी पक्षाचं प्रचंड मोठं अपयश आहे. आज विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. परंतु अद्याप विरोधकांना त्यांचा गटनेता निवडता आलेला नाही. कारण तिन्ही पक्षांमध्ये योग्य संपर्कच नाही. त्यांच्या कितीही बैठका होत असल्या तरी विरोधी पक्षनेतेपदावर त्यांचं एकमत होऊ शकलेलं नाही.
अशातच आज (२८ जुलै) महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी आज मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत महाविकास आघाडीची आगामी काळातली भूमिका आणि निडणुकांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. तसेच विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोणाला करावं, याबाबत शरद पवार काँग्रेसला सल्ला देतील असं बोललं जात आहे. याबद्दल टीव्ही ९ मराठीने आमदार संजय गायकवाड यांना प्रश्न विचारला. त्यावर आमदार संजय गायकवाड म्हणाले, शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय होतं ते सर्वांनी पाहिलं आहे.
शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय होतं ते सर्वांनी पाहिलं आहे
आमदार संजय गायकवाड म्हणाले, “आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या सल्ल्याने चालली, काँग्रेसही पवारांच्या सल्ल्याने चालणार आहे. शेवटी शरद पवारांच्या सल्ल्यामुळे काय परिणाम झाला ते अजित गट बाहेर पडल्याने दिसलं आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे दुसरा कुठला पक्ष महायुतीतून बाहेर पडतो का? हे येत्या काळात पाहावं लागेल.” गायकवाडांच्या उत्तरावर प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने गायकवाड यांना विचारलं, तुम्ही नेमकं काय सूचक वक्तव्य करताय? त्यावर आमदार गायकवाड म्हणाले, “ते तुम्ही समजून जा, याला इतिहास साक्षी आहे.”