नवी दिल्ली,दि.14: Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल कधी लागणार? हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. या दिवशी लागणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी 16 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली. घटनापीठाने निकाल राखून ठेवला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. राज्यात सत्तांतर झाले. शिंदे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार की, ठाकरे पुन्हा येणार, हा उभ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सुप्रीम कोर्ट देणार आहे. आठ महिन्यांच्या सुनावणीनंतर आता महाराष्ट्राला प्रतिक्षा आहे, ती निकाल कधी लागणार याची. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. याच सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आता निकालाची संभाव्य तारीखही समोर आली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची मॅरेथॉन सुनावणी 16 मार्च 2023 रोजी पूर्ण झाली. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने निकाल राखून ठेवला. सुनावणीदरम्यान झालेल्या युक्तीवादातून लोकांनी कोण कसं जिंकणार, हरणार याचे आराखडे बांधून झाले. आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. सुनावणीनंतर साधारणतः महिनाभरात निकाल लागतो. 16 एप्रिलला सुनावणी पूर्ण होऊन महिना होतो आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी निकाल येईल, अशी परिस्थिती आहे. असं असलं तरी महिनाभरात निकाल दिलाच पाहिजे, असं कोणतंही बंधन सुप्रीम कोर्टावर नाही, हेही ध्यानात घेतलं पाहिजे.
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल
अशातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील या घटनापीठात न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. नरसिंहा यांचा समावेश आहे. यापैकीच एक न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. आणि संकेत असा आहे, की सुनावणी पूर्ण झाली असेल आणि संबंधित घटनापीठातील एखादे न्यायमूर्ती सेवानिवृत्त होणार असतील, तर त्यांच्या सेवानिवृत्तीआधी निकाल दिला जातो.
अयोध्येतील बाबरी मशिदीबद्दल तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी झालीो होती आणि गोगोईंच्या निवृत्तीआधी राखीव ठेवलेला निकालही जाहीर झाला होता. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकालही एम. आर. शाह यांच्या निवृत्तीआधी म्हणजेच 14 मेच्या आधी लागण्याची दाट शक्यता आहे.
सुप्रीम कोर्टाला 20 मे ते 2 जुलै सुट्टी
दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाला 20 मे ते 2 जुलै अशी उन्हाळी सुट्टी असणार आहे. त्यामुळे एप्रिल शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कधीही निकालाची शक्यता आहे, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
17 एप्रिल ते 14 मे या काळात लागणार निकाल
सुप्रीम कोर्ट एखाद्या प्रकरणाचा निकाल देणार, हे आदल्या दिवशीच जाहीर केलं जातं. कोर्टाच्या कामकाज यादीत एक दिवस आधी निकालाची ही तारीख येते. त्यामुळे सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, तेव्हा एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. आता ही तारीख नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे. 17 एप्रिल ते 14 मे या महिनाभराच्या काळात कधीही निकाल लागण्याची शक्यता आहे.