अमरावती,दि.14: BJP-Congress: देशभरात काँग्रेस आणि भाजपा एकमेकांविरोधात रान उठवत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हटले जाते. याचा प्रत्यय आला आहे. अमरावती जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक घोषित झाली आहे. दर्यापुर, अचलपुर, अमरावती, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, वरुड, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि धारणी या बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सध्या सर्व बाराही कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक आहे.
हेही वाचा Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल या दिवशी लागणार
भाजपा आणि काँग्रेसची युती | BJP-Congress
यातीलच वरुड आणि मोर्शीमध्ये भाजपने काँग्रेससोबत युती केली आहे. येत्या 30 एप्रिल रोजी वरुड आणि मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांसाठी भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी काँग्रेस माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रम ठाकरे यांच्या सोबत हातमिळवणी केली आहे. एका बाजूला देशभरात काँग्रेस आणि भाजप एकमेकांविरोधात रान उठवत असताना भाजपने काँग्रेससोबत युती केल्याने खळबळ उडाली आहे.
या युतीबाबत बोलताना अनिल बोंडे म्हणाले, वरुड बाजार समितीमध्ये पूर्वी राष्ट्रवादीची सत्ता होती. पण वरुडमध्ये राष्ट्रवादीने प्रगती होऊ दिली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची सत्ता उलटून टाकण्यासाठी युती करण्यात आली आहे. पण ही युती पक्षासोबत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सहकार क्षेत्रात पक्ष नसतो, गटातटाच्या निवडणुका असतात आणि भाजपचे प्रतिनिधी मोठ्या मताधिक्याने यशस्वी होतील, अशी प्रतिक्रिया बोंडे यांनी दिली.
दरम्यान, या युतीमुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाराज असल्याच्या चर्चा आहेत. भाजपसोबत युती करत असताना काँग्रेस नेत्यांनी नाना पटोले यांना विश्वासात घेतल नाही का? असा सवाल विचारला जात आहे. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा बाजार समिती निवडणुकीमध्येही काहीस असचं चित्र बघायला मिळालं आहे.