Akola Violence: अकोला शहरात वादग्रस्त पोस्टमुळे दगडफेक अन् जाळपोळ, एकाचा मृत्यू

0

अकोला,दि.14: Akola Violence: अकोला शहरातील जुने शहर भागातल्या हरिहरपेठमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा झाला. यात एकाचा मृत्यू झाला आहे. या राड्यात वाहनांची प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. राडा घालणाऱ्या अनेक दुचाकी, चारचाकी आणि फायर ब्रिगेडच्या दोन वाहनांची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. तर काही ठिकाणी चारचाकी गाड्यांना आग लावण्याचाही प्रयत्न झाला.

अकोल्यातील हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर सेतू येथे शहरातील एका भागांतून एक मोठा समूह चालून आला. या समूहानं संपूर्ण भागात दगडफेक आणि जाळपोळ करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटातील एकूण 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले आहेत. एका व्यक्तीनं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यामुळे ही दंगल भडकल्याचं बोललं जात आहे. या व्यक्तीवर रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

एका फेसबुक पोस्टवरुन या राड्याला सुरुवात | Akola Violence

एका फेसबुक पोस्टवरुन या राड्याला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. एका तरुणानं ही फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे वातावरण चिघळलं आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये तुफान राडा झाला. त्यानंतर पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत असतानाच एक मोठा जमाव शहरात रस्त्यावर उतरला आणि त्यांनी उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. वाहानांची तोडफोड करत जाळपोळ सुरू केली. तसेच काही घरंही पेटवण्याचा प्रयत्न जमावाकडून करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शहराच्या काही भागांत अचानक दगडफेक सुरू करण्यात आली. वाहानांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली. तसेच पोलिसांनी बोलताना नागरिकांना आवाहनही केलं आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं.

दरम्यान, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अकोल्यात अलीकडच्या काळात कायदा सुव्यवस्थेची लक्तरं वेशीवर टांगली असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अकोल्याचे पालकमंत्रीही आहेत. अकोल्यात सध्या हरिहरपेठ आणि इतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या संपूर्ण शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असली तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

अकोला शहरातील दोन गटात वाद प्रकरणी हरिहर पेठ परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राखण्याचं आवाहन वारंवार पोलिसांकडून नागरिकांना केलं जात आहे. तणावाच्या ठिकाणी कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय वाशिममधून अतिरिक्त कुमकही मागवण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here