मुंबई,दि.2: ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत ओबीसी-मराठा आरक्षण वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार आहे. अशातच मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक आहेत. तर ओबीसीतून आरक्षण देण्यास लक्ष्मण हाके आणि ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे.
काही छोट्या मोठ्या पक्षांकडून उमेदवारांच्या घोषणाही केल्या जात आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही रोहित पवार, रोहित पाटील, राजेश टोपेंसह 50 उमेदवारांचे टेन्शन वाढवले आहे. लक्ष्मण हाकेंनी यांनी जाहीर केले की, मनोज जरांगे यांना मदत करणाऱ्या 50 नेत्यांना विधानसभा निवडणुकीत पाडणार आहे. त्यांना पाडण्यासाठीचा कृती कार्यक्रमही हाकेंनी सांगितला.
आम्ही 50 उमेदवार निवडून आणण्याची यादी लवकरच तयार करू. येत्या विधानसभा निवडणुकीला आम्ही 50 उमेदवार पाडायचे हे ठरवलं आहे. ज्यांनी जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली त्यांना आम्ही पडणार. आम्ही रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारख्या उमेदवारांना पाडणार, असेही लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
ओबीसींची लोकसंख्या…
माध्यमांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, “दुय्यम वागणूक ओबीसींना पक्षाकडून दिली जाते. ओबीसींना विनंती आहे की, पुढे या आणि नेतृत्व करा. 50 ते 60 टक्के ओबीसींची लोकसंख्या आहे, त्यांची भीती शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांना कधी बसणार आहे. एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, भाजपाचे नेते यांना ओबीसी मतांची भीती कधी बसणार आहे?”, असा सवाल त्यांनी केला.
विदर्भातील ओबीसी नेत्यांना विनंती आहे की हैदराबाद गॅजेट असेल किंवा इतर बाबतीतून ओबीसी आरक्षण मुख्यमंत्री घालवतील. ओबीसी आरक्षणाची अजूनही गरज आहे. सामान्य ओबीसीच्या हितासाठी ओबीसी नेत्यांनी समोर यावे. विदर्भ ओबीसी चळवळीत कुठेही मागे पडणार नाही, असे लक्ष्मण हाके म्हणाले.
“विदर्भातील ओबीसी नेतृत्वाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. नेतृत्व पुढे यायला लागले तर दुय्यम वागणूक मिळते. ओबीसींना यांच्या तुकड्यावर जगू नये. ओबीसीची भूमिका घेणारे अनेक तरुण विधानसभेत तुम्हाला दिसणार आहे. आता लक्ष्मण हाके रस्त्यावरची लढाई लढणार आहे”, असेही लक्ष्मण हाकेंनी म्हटले.