Nilesh Rane: निलेश राणे करणार शिवसेनेत प्रवेश?

0

मुंबई,दि.2: भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करण्याची शक्यता आहे. विविध वृत्त वाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे. महायुतीमध्ये तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. भाजपा नेते नारायण राणेंनी कुडाळ मतदारसंघाबाबत भेट घेतल्यानंर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उदय सामंत यांना तातडीने भेटण्यासाठी बोलावलं आहे. 

नारायण राणे यांनी 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. नारायण राणेंसोबत त्यांचे दोन्ही मुलं देखील शिवसेनेपासून दुरावली. गेल्या 19 वर्षात परिस्थिती बरीच बदलली आहे. नारायण राणे आणि त्यांची मुलं आता भाजपमध्ये आहेत. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून, ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. 

कुडाळमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक सध्या आमदार आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर वैभव नाईक यांनी ठाकरेंची साथ दिली. त्यामुळे या मतदार संघावर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे. मात्र हा मतदार संघ भाजपला सुटावा असे राणे यांचे प्रयत्न आहेत. या मतदार संघातून राणेंचे पुत्र निलेश राणे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघात तयारीही सुरू केली आहे.

भाजपाला ही जागा मिळणे अवघड असल्यानं तोडगा म्हणून निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणे कुटुंबीयांकडून कुणीही या मतदारसंघात निवडणूक लढवलेली नाही. त्यामुळे यंदा 10 वर्षांनी पुन्हा एकदा कुडाळमधून राणे विरुद्ध नाईक या पारंपारिक प्रतिस्पर्धींमध्ये लढत होऊ शकते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here