पुणे,दि.11: दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही, दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? अशी अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरातून अचानक गायब झाले. यानंतर बरेच दिवस अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्याही समोर आल्या. यादरम्यान अजित पवार पुन्हा एकदा नाराज असल्याच्या राजकीय चर्चाही रंगल्या. मात्र, आता त्यांनी स्वतःच या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार यांनी मावळातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, की मी आजारी असल्याने आणि इतर कारणांमुळे काही ठिकाणी उपस्थित राहू शकलो नाही. मीडियावर काहीही बातम्या देतात, असं म्हणत अजित पवारांनी नाराज नसल्याचं स्पष्ट नाकारलं आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाचं खापर मीडियावर फोडलं आहे.
अजित पवार म्हणाले, ‘गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबरला मी परदेशात गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच बातम्या लागल्या असत्या. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही. दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? उगाच काहीही उठवून बदनामी करायची’, असं म्हणत गायब असणाऱ्या आणि नाराजीच्या वृत्तावर त्यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली.
अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा
शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीरालाही विरोधी पक्षनेते अजित पवार गैरहजर होते. यावर चार तारखेला शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबीरातुन अजित पवार आजोळी गेले आहेत, असं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र अजितदादा आपल्या आजोळी देवळाली प्रवरा येथे पोहचलेच नाही. मग अजितदादा गेले कुठे? असा प्रश्न आता निर्माण झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही शिर्डीत पहिल्या दिवशी अजित पवार यांचं जवळपास दीड तास भाषण झालं. त्यानंतर ते शिर्डीतून निघून गेले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रूग्णालयातून थेट शिबीराला हजेरी लावली होती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. ब्रीच कँडी रुग्णालयातून शरद पवार थेट शिर्डीत पोहोचले होते. मात्र, अजित पवार या कार्यक्रमाला गैरहजर होते. यानंतर चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. मात्र, आता अजित पवार यांनी स्वतःच या चर्चा फेटाळल्या आहेत.