ठाकरे गट आणि वंचितमध्ये महत्वपूर्ण बैठक; प्रकाश आंबेडकरांनी दिले ‘हे’ संकेत

0

मुंबई,दि.१६: ठाकरे गट आणि वंचितमध्ये महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. ‘इंडिया आघाडी’तील (India Alliance) वंचितच्या प्रवेशाचं भवितव्य 19 डिसेंबरच्या आगामी इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर ठरणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिली. ते अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथे माध्यमांशी बोलत होते. या बैठकीनंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे असल्याचं आंबेडकर म्हणाले आहेत. यासंदर्भात नुकतीच वंचित आणि ठाकरे गटात उच्चस्तरीय बैठक झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्यात ‘इंडिया’च्या बैठकीत नेमकं काय मांडायचं यावर झाली चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘इंडिया आघाडी’च्या बैठकीनंतर पुढचं सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला आहे.

19 डिसेंबरनंतर घेणार निर्णय

वंचित बहुजन ‘इंडिया आघाडी’त सहभागी होणार की यावर 19 डिसेंबरला होऊ घातलेल्या ‘इंडिया’च्या बैठकीनंतर निर्णय होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीच्या ‘इंडिया आघाडी’त सहभागाबद्दल चर्चा सुरू आहेत. मात्र, माध्यमांतून होत असलेल्या या चर्चा मात्र प्रत्यक्षात टेबलवर झाल्याच नाहीत. मात्र, आता लोकसभा निवडणुक अगदी जवळ आल्याने वंचितने याचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला आहे. वंचितनं ही सर्व जबाबदारी  त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर सोपवली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना ही आधीच ‘इंडिया आघाडी’तील महत्वाचा घटक पक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि वंचितच्या युतीची घोषणा झालेली असतांना वंचितचा ‘इंडिया’ आघाडीतील प्रवेश मात्र रखडला आहे. यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं हा मुद्दा आतापर्यंत थंडबस्त्यात ठेवला होता. वंचितनं यासंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंना एक पत्र लिहिलं होतं. तर 26 नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या ‘संविधान बचाव रॅली’ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींना वंचितनं निमंत्रण दिलं होतं. तेलंगणात प्रचारात व्यस्त असलेल्या राहुल गांधींनी या रॅलीत आपले प्रतिनिधी म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पाठवलं होतं. 

उद्धव ठाकरे बनणार प्रकाश आंबेडकरांचे ‘दुत’

प्रकाश आ़ंबेडकरांच्या ‘इंडिया आघाडी’तील  प्रवेशाबद्दल आधीपासूनच उद्धव ठाकरेंनी आग्रही भूमिका मांडली. मात्र, काँग्रेसनं हा मुद्दा आतापर्यंत तसाच प्रलंबित ठेवला होता. मात्र, तीन राजात काँग्रेसचा पराभव झाल्यानं काँग्रेस काहीशी ‘बॅकफूट’वर गेली आहे. याच परिस्थितीत आता 19 डिसेंबरच्या बैठकीत उद्धव ठाकरे ‘वंचित’च्या प्रवेशाचा मुद्दा धसास लावण्याच्या प्रयत्नात आहे. याच मुद्द्यावर वंचित आणि ठाकरे गटाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. यात भविष्यातील दोन्ही पक्षांच्या संबंधांवरही चर्चा झाली. 

वंचित घेणार पुढचा निर्णय!

या बैठकीत काय निर्णय होणार आहे, यावर पुढची राजकीय वाटचाल अवलंबून असेल. या बैठकीत ‘इंडिया आघाडी’त वंचित’च्या समावेशावर शिक्कामोर्तब झाले तर राज्याच्या राजकारणावर त्याचे दुरोगामी परिणाम होतील. आंबेडकरांच्या समावेशानं राज्यात ‘इ़डिया’ आघाडी मजबूत होईल. जर या बैठकीत समावेशाचा निर्णय झाला नाही तर आंबेडकरांना उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीवरही फेरविचार करावा लागू शकतो. यासोबतच पुढे ‘एकला चलो रे’ची भूमिका घ्यायची की नवे मित्रपक्ष जोडायचे यावर वंचितला निर्णय घ्यावा लागणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here