Haribhau Bagade: 16 आमदार अपात्र ठरतील? माजी विधानसभा अध्यक्षांचा मोठा दावा

0

छत्रपती संभाजीनगर,दि.12: Haribhau Bagade On Maharashtra Political Crisis: 16 आमदार अपात्र ठरतील? याबाबत माजी विधानसभा अध्यक्षांनी मोठा दावा केला आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमचाच व्हीप लागू होणार असल्याने 16 आमदार अपात्र ठरतील, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं असतानाच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagade) यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाचा व्हीप कुचकामी आहे. तो लागू होणार नाही. त्यामुळे आमदार अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. हरिभाऊ बागडे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

16 आमदार अपात्र ठरतील? | काय म्हणाले हरिभाऊ बागडे

हरिभाऊ बागडे यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होण्याची शक्यता नाही. ठाकरे गटाने बजावलेला व्हीप सभागृहाला लागू होणार नाही ठाकरे गटाने बजावलेला व्हीप सभागृहाबाहेरचा आहे. तो खासगी पातळीवरचा आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा व्हीप सभागृहाला लागू होणार नाही. ठाकरे गटाचा व्हीपच लागू होणार नसल्याने 16 आमदार अपात्र होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा हरिभाऊ बागडे यांनी केला आहे. बागडे यांच्या या दाव्यामुळे सुनील प्रभू यांचा व्हीप कुचकामी ठरणार असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

पण 16 आमदारांबाबत जे घडलं ते… | Haribhau Bagade

विधीमंडळात काही घडलं तसा मंत्र्याकडून कार्यक्रम आला तर अध्यक्ष निर्णय घेऊ शकतात. पण 16 आमदारांबाबत जे घडलं ते सभागृहात घडलेलं नाही. ती सभागृहाच्या बाहेरची बैठक होती. सभागृहाबाहेरच्या बैठकीला आमदार आले नाही म्हणून व्हीप पाळला नाही असं म्हणता येत नाही. आमदारांसाठी सभागृहातील व्हीप महत्त्वाचा आहे. बाहेरच्या व्हीपला अर्थ नाही. त्यामुळे आमदार अपात्र होणार नाहीत, असं बागडे यांनी स्पष्ट केलं.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ठाकरे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांचं प्रतोदपद रद्द केलं आहे. त्यामुळे माझ्या शिवसेनेचाच व्हीप लागू होणार आहे. त्या व्हीपनुसारच विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यावा लागणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी तसा निर्णय दिल्यास शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरतील, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here