मुंबई,दि.११: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आता यावर निकाल देतील. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं सरकार बचावलं आहे. राहुल नार्वेकर आता याप्रकरणी काय निकाल देतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. राहुल नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्रात परतल्यावर याप्रकरणी कार्यवाही करतील. दरम्यान, नार्वेकर यांनी काही माध्यमांशी बातचित केली आणि आमदारांच्या अपात्रतेबद्दल माहिती दिली.
काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर?
राहुल नार्वेकर म्हणाले, आमदारांच्या पात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. हे सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा नमूद केलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो. येत्या काळात यावर सुनावणी घेऊ. आम्ही याप्रकरणी लवकारत लवकर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु त्याआधी आपल्याला इतर कार्यवाही पूर्ण करावी लागेल.
राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वात आधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व नेमकं कोण करतं याचा निर्णय घ्यावा लागेल. कोर्टाने तसंच सांगितलं आहे. त्यामुळे आम्ही सर्वात आधी यावर निर्णय घेऊ. यावेळी सर्वांना त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिला जाईल. संसदीय लोकशाहीला बळकट करणारा निर्णय घेतला जाईल. योग्य वेळेत आमदारांच्या पात्रतेसंदर्भात निकाल दिला जाईल.
यावेळी राहुल नार्वेकर यांना विचारण्यात आलं की, योग्य वेळ म्हणजे नेमका किती वेळ लागेल. त्यावर नार्वेकर म्हणाले, मी आधी म्हटल्याप्रमाणे आमदारांच्या पात्रता-अपात्रतेआधी राजकीय पक्षाचं प्रतिनिधीत्व कोण करतंय यावर निर्णय घेतला जाईल. यासाठी व्यवस्थित चौकशी केली जाईल. पक्षाची घटना काय म्हणतेय याचा विचार करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे नेमका किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सर्व याचिकांवर सुनावणी घेतली जाईल.