नवी दिल्ली,दि.27: माजी पंतप्रधान मनमोहन सिंह (Manmohan Singh) यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी रात्री ९.५१ वाजता एम्समध्ये त्यांचे निधन झाले. प्रकृती बिघडल्यामुळे संध्याकाळी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह हे दीर्घकाळापासून आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड देत होते. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी अविभक्त भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंह यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली. डॉ. मनमोहन सिंह यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली. त्यांच्या शिक्षणाची आवडीमुळे ते पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकवू लागले.
एम्सने निवेदन जारी केले
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. भारतीय राजकारण आणि आर्थिक सुधारणांमध्ये त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. 1991 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला उदारीकरणाच्या मार्गावर नेणाऱ्या डॉ. मनमोहन सिंह यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी दोन टर्म (2004-2014) भारताचे पंतप्रधान म्हणून काम केले आणि देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.