मुंबई,दि.२४: शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे. माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. परंपरेनुसार ठाकरे गटाचा मेळावा दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार असून यंदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर पार पडणार आहे. या मेळाव्यात एकनाथ शिंदे कुणावर बाण सोडणार हे पाहणे गरजेचे आहे. तत्पूर्वी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला शिंदे गटाने ठाकरे गटाला धक्का दिला आहे.
मुंबईतील माजी नगरसेवकांनी आणि शाखाप्रमुख, पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंना रामराम करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. सातत्याने शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. मुंबईतील वांद्रे विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९९ चे माजी नगरसेवक विलास चावरी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह असंख्य कोळी बांधवांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबई शहराला अधिक सुंदर आणि आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यासाठी अनेक विकासकामे सुरू असून या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात येणार आहे. वांद्रे परिसरात कोळी बांधवांना भेडसावणारे प्रश्न सरकारच्या माध्यमातून नक्की सोडविण्यात येतील अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
विलास चावरी यांनी २०१४ साली उबाठा गटाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. रायगड जिल्ह्याचे ते संपर्कप्रमुखही होते. तसेच खारदांडा शाखेचे ते शाखाप्रमुखही होते. मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेना पक्षात त्यांचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपशाखाप्रमुख विकास चव्हाण, गटप्रमुख विजय खरपुडे, अजय शिगवण, संतोष ठाकूर, नंदू निकम, सनी टिळेकर यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.