सोलापूर,दि.24: सोलापूर नेहरू युवा केंद्राचे सुभाष चव्हाण निलंबित करण्यात आले आहे. कार्यालयात दारूच्या बाटल्या आढळल्या होत्या. नेहरू युवा केंद्राच्या सोलापूर येथील कार्यालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळल्यानंतर भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे आणि भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सदस्य यतिराज होनमाने यांनी कार्यालयाची तपासणी केली असता अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
स्थानिक प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी दोन वाजता नेहरू युवक केंद्र कार्यालयात आले असताना कार्यालयामध्ये दारूच्या बॉटल सापडल्या याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर वृत्त प्रसारित झाले होते.
इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये प्रसारित झालेल्या त्या वृत्ताबाबत नेहरू युवा केंद्राचे एमटीएस सुभाष चव्हाण हे दोषी आढळले आहेत. नेहरू युवा केंद्रात दारूच्या बॉटल सापडणे व अन्य काही आरोप सुभाष चव्हाण यांच्यावर लावण्यात आले आहेत. प्रसारित झालेल्या वृत्तानुसार सुभाष चव्हाण हे प्राथमिक स्तरावर दोषी आढळले आहेत. चव्हाण यांच्या अशा वर्तुणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नेहरू युवा केंद्र संघटनाची प्रतिमा मलीन झालेली आहे.
उपरोक्त संपूर्ण स्थिती लक्षात घेता सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार नेहरू युवा केंद्र सोलापूरचे एमटीएस सुभाष चव्हाण यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. चव्हाण यांचे निलंबन कालावधीत नेहरू युवा केंद्र सोलापूर हेच मुख्यालय राहणार असल्याचेही त्यात नमूद केलेले आहे, अशी माहिती सोलापूर नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
नेहरू युवा केंद्रात उपरोक्त घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार यांना तात्काळ संबंधित कर्मचारी याचा रिपोर्ट करण्यास कळवले. त्यानुसार अजित कुमार यांनी संबंधित कर्मचारी व घटनेविषयी सविस्तर अहवाल त्यांच्या वरिष्ठ कार्यालय व जिल्हा प्रशासनास केला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या घटनेची घेतलेली गांभीर्यपूर्वक दखल व केलेला पाठपुरावा यामुळे नेहरू युवा केंद्राचे एमटीएस चव्हाण यांना त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाने निलंबित केलेले आहे. जिल्हा प्रशासनात अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना खपवून घेतली जाणार नाही असा संदेश या कारवाईतून देण्यात आलेला आहे.