सोलापूर,दि.१०: दारू आणि गांजाच्या भयंकर व्यसनापायी संपूर्ण कुटुंबाला वेठीस धरणाऱ्या मुलाचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या वडिलांसह चौघांची सोलापूर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. अक्कलकोट रोड परिसरातील जामदार वस्ती येथे घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाली होती.
व्यसनाचा अतिरेक अन् संपूर्ण कुटुंब वैतागले
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शैलेश सुरेश घोंगडे (वय ३१) याला दारू आणि गांजाचे तीव्र व्यसन होते. व्यसनाच्या नशेत तो सतत स्वतःच्या वडिलांकडे पैशांची मागणी करून त्यांना मारहाण करत असे. एवढेच नव्हे तर आई, भाऊ आणि भावजयीलाही तो अमानुष मारहाण करून घरातील साहित्याची नासधूस करत असे. त्याच्या या सततच्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब अक्षरशः मेटाकुटीस आले होते.
पोलिसांचे दोषारोपपत्र
दिनांक २८ जानेवारी २०२० रोजी अक्कलकोट रोडवरील जामदार वस्तीसमोर शैलेशचा गळा आवळून खून झाल्याची घटना घडली होती. या मुलाच्या त्रासाला कंटाळूनच वडील सुरेश सिद्धलिंग घोंगडे (रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर) यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. वळसंग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाअंती पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते.
पुराव्यांअभावी न्यायालयाचा अंतिम निर्णय
सोलापूर सत्र न्यायालयात या खटल्याची अंतिम सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान सरकार पक्षाकडून लावण्यात आलेल्या आरोपांचे सबळ पुरावे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने संशयाचा फायदा देत मयताचे वडील सुरेश घोंगडे यांच्यासह इतर तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या महत्त्वपूर्ण खटल्यात आरोपींच्या वतीने ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे आणि ॲड. प्रणित जाधव यांनी कामकाज पाहिले.








