नवी दिल्ली,दि.१०: राजधानी दिल्लीच्या विमानतळावर आज एक अतिशय नाट्यमय आणि राजकीय वातावरण तापवणारा प्रकार घडला. कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दिपके (Abhijet Dipke) दिल्लीत उतरण्यापूर्वीच, विमान धावपट्टीवर असतानाच दिल्ली पोलिसांनी थेट विमानात प्रवेश करून त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांची ही अचानक झालेली कारवाई पाहून दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त करत, “अशी आणीबाणी आणि दडपशाही तर खुद्द इंदिरा गांधींच्या काळातही पाहिली नव्हती,” असा घणाघाती टोला लगावला.
विमानात नक्की काय घडलं?
मुंबईहून दिल्लीला पोहोचलेले विमान अजून पूर्णपणे रिकामेही झाले नव्हते, तेवढ्यात दिल्ली पोलीस आणि महिला कर्मचाऱ्यांचे एक पथक विमानात शिरले. पोलिसांना समोर पाहताच अभिजीत दीपके आपल्या सीटवरून उठून उभे राहिले.
कोणतीही भीती न दाखवता ते पोलिसांना थेट म्हणाले: “करा मला अटक! मी इथे अटक व्हायलाच आलो आहे. मी तुम्हाला किंवा तुमच्या या दडपशाहीला मुळीच घाबरत नाही.”
‘ही तर उघडउघड हुकूमशाही!’
कारवाईदरम्यानचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दीपके अतिशय आक्रमक पवित्र्यात दिसत आहेत. उपस्थितांशी बोलताना ते म्हणाले, “देश कोणत्या दिशेने चालला आहे हे तुम्हीच पाहा. थेट विमानात घुसून नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे. असा प्रकार तर देशात इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळातही कधी घडला नव्हता. ही लोकशाही नसून उघडीबोडकी हुकूमशाही आहे.”
कारवाईमागचे कारण काय?
निवडणूक आयोगाविरोधात जंतर-मंतर येथे प्रस्तावित असलेल्या मोठ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी अभिजीत दीपके आणि इतर प्रमुख नेते दिल्लीत आले होते. मात्र, सुरक्षेचे कारण देत दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला असून, दीपके दिल्लीत पाऊल ठेवण्याआधीच त्यांना विमानातच रोखून ताब्यात घेण्यात आले.








