मुंबई,दि.29: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा चीनच्या सीमेलगत उभारण्यात आला आहे. देशातील जनतेत स्वराज्याची धग निर्माण करणारे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंचावरील पुतळा लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ उभारण्यात आला आहे. हा समस्त भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या पुतळ्याचे अनावरण भारतीय लष्कराकडून करण्यात आले.
मराठा साम्राजाचा भगवा आता हिमालयाच्या पर्वतरागांतही फडकणार आहे. 26 डिसेंबरला 14,300 फूट उंचीवर पँगॉन्ग त्सोच्या काठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. शौर्य, दूरदृष्टी आणि अटूट न्यायाचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा म्हणजे त्यांना मानाची आदराजंली आहे, अशी भावना लष्कराने व्यक्त केली आहे.
लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला, SC, SM, VSM, GOC फायर अँड फ्युरी कॉर्प्स आणि कर्नल मराठा लाईट इन्फंट्री यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्य, रणनीती आणि न्यायाची परंपरा आधुनिक लष्करी कारवायांमध्येही प्रेरणा देते. फायर अँड फ्युरी कॉर्प्सने अनावरणाचा आनंदोत्सव साजरा केला. याबाबत ट्विट केले आहे की, पॅन्गॉन्ग तलावाजवळ 14,300 फूट उंचीवर स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे. दररोज आपल्यासोबत राहणाऱ्या वारशाचा आपण सन्मान करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराज हे लाखो लोकांचे प्रेरणास्थान आहेत. देशभरात त्यांना मानणार तसेच त्यांचा आदर्श घेणारा मोठा वर्ग आहे. यादरम्यान भारतीय लष्कराने पूर्व लडाखमध्ये भारत चीन सीमेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला असून नुकतेच या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. हा पुतळा चीनबरोबरच्या सीमेवरील वास्तविक नियंत्रण रेषेच्या (LAC) जवळ पँगॉन्ग तलावाच्या किनार्यावर 14,300 फुट उंचीवर उभारण्यात आला आहे.