सोलापूर,दि.3: माजीमंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पाटील यांचा सत्कार केला आहे. दिलीप सोपल यांना बार्शी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने (ठाकरे गट) उमेदवारी दिली आहे. तर आमदार राजेंद्र राऊत यांना शिवसेनेने (शिंदे गट) उमेदवारी दिली आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात सोपल यांनी राऊत यांच्या लढत होणार आहे. बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरूध्द शिवसेना असा सामना रंगणार आहे.
अशातच दिलीप सोपल यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार केला आहे. मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील ना स्वार्थ ना कोणता फायदा फक्त आरक्षण हा ध्यास घेऊन झगडणाऱ्या योध्याच्या आदरयुक्त सन्मान आणि सत्काराला आनंदयात्री दिलीप सोपल साहेब पोहचले. अशी पोस्ट सोपल समर्थकांकडून करण्यात आली आहे.
या सत्कार समारंभाला मकरंद निंबाळकर, नंदकुमार काशीद, शशिकांत गव्हाणे, विकास जाधव, तात्या काटमोरे, राजाभाऊ चव्हाण , गणेश नाना जाधव, पंकज शिंदे, भैया गव्हाणे, सुजित शेळवणे, मयूर डोईफोडे, पिंटू माळगे, बाबा माळगे आदी उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून लढणार आहोत हे जाहीर केलं आहे. तसंच जिथे उमेदवार द्यायचा नाही त्या मतदारसंघात उमेदवार पाडला जाणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. बार्शी मतदारसंघाबाबत जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.